दक्षिण मुंबईमधील गिरगावातील मुगभाट परिसरातील उरणकर वाडीच्या नाक्यावरील गेली अनेक वर्षे बंद असलेल्या गोदामाला बुधवारी रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदाम आगीत भस्मसात झाले. तसेच गोदामालगत रस्त्यावर उभ्या असलेल्या सात चारचाकी, आठ दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत रात्री ३ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, फटाक्यांमुळे गोदामाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा >>>मुंबई : राज्यातील २९ हजार कोटींच्या घोटाळ्यांचा तपास लवकरच! ; सीबीआयला राज्यात तपासाधिकार बहाल
गिरगावामधील मुगभाट उरणकरवाडीच्या नाक्यावरील गोदामाला बुधवारी रात्री १२.१० च्या सुमारास अचानक आग लागली. या गोदामात रेक्झिन, फोम, प्लास्टिक, बांबू, लाकडे आदी ज्वलनशील वस्तूंचा साठा होता. त्यामुळे आगीने क्षणातच अक्राळविक्राळ रूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण गोदाम वेढले गेले. लगतच्या तीन मजली इमारतीलाही आगीची धग लागू लागली. अखेर या इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. गोदामालगत रस्त्यावर उभ्या असलेल्या सात चारचाकी, आणि आठ दुचाकी आगीत जळून खाक झाल्या.
हेही वाचा >>>मुंबई: गिरगावमधील गोदामात भीषण आग, १४ गाड्या जळून खाक, फटाक्यांमुळे आग लागल्याचा संशय
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. गोदामाचे एक टोक उरणकर वाडीच्या दिशेला, तर दुसरे टोक शेणवे वाडीच्या टोकाला होते. शेणवे वाडीतील अरुंद रस्ता आणि दुतर्फा उभ्या वाहनांमुळे अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला होता. मात्र शिवसैनिक आणि स्थानिक रहिवाशांनी रस्ता मोकळा करून दिल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. आग क्षणाक्षणाला भडकत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत रात्री तीनच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घघटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा >>>मुंबई: मॉडेलबरोबर रोमान्स करताना रंगेहाथ पकडल्यानंतर चित्रपट निर्मात्याने पत्नीला गाडीने उडवलं; धक्कादायक Video
ही आग फटाक्यांमुळे आग लागल्याची शक्यता आहे. गोदामातील ज्वलनशील वस्तूंनी पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. या घटनेत जीवित हानी झाली नाही, अशी माहिती व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने दिली. आगीची झळ लागलेली वाहने ओढून बाजूला काढताना एक रहिवासी किरकोळ जखमी झाला. काही शिवसैनिक आणि स्थानिक रहिवाशांनी वेळीच काही वाहने हलविली. त्यामुळे मोठे नुकसान टळले. मात्र अग्निशमन दलाकडे फ्लडलाईट नव्हते. त्यामुळे रात्री अग्निशमनात अडथळे येत होते, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.