लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: धारावी येथे घरगुती वादातून पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याचा आणि त्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. उपचारादरम्यान पत्नी पाठोपाठ पतीचाही मृत्यू झाला असून या प्रकरणी धारावी पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

धारावीमधील नाईक नगर येथील अशोक गल्लीतील खोली क्रमांक ४१५ मध्ये प्रिया धुरिया (२६) व अनिल धुरिया (२६) दाम्पत्य राहत होते. अनिलला दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडण होत होते. अनिल बुधवारी दाऊ पिऊन घरी आल्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

हेही वाचा… मुंबईः पत्नीला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न,दोघेही गंभीर भाजले

भांडणामुळे त्यांचा दीड वर्षाचा मुलगा रडू लागल्यानंतर शेजारी राहणारी महिला त्याला आपल्या घरी घेऊन गेली. त्यानंतर अनिलने मद्यधुंद अवस्थेत घरातील रॉकेल प्रियाच्या अंगावर ओतले व तिला पेटवले. त्यानंतर त्याने स्ततःच्या अंगावरही पेट्रोल ओतून घेतले व आग लावली. या घटनेत दोघेही गंभीर भाजले असून त्यांना तात्काळ शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा… मुंबई: जे.जे. रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया कक्ष होणार अद्ययावत

या घटनेत प्रिया १०० टक्के, तर अनिल ९० टक्के भाजला होता. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी प्रियाचा मृत्यू झाला. या प्रकरणी धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. उपचारादरम्यान रात्री उशीरा अनिलचाही मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A husband killed his wife and committed suicide in dharavi mumbai print news dvr