आरे वन आहे की नाही आणि तेथे जैवविविधता आहे की नाही यावरून राजकीय वाद विकोपाला पोहोचलेला असतानाच येथील केलटी पाड्यातील एका घराच्या दारातच मंगळवारी रात्री बिबट्याचा वावर सीसी टीव्ही कॅमऱ्यात कैद झाला. आरे वसाहत परिसरातील केलटी पाड्यामधील भोईर कुटुंबाच्या घराच्या दारात येऊन बिबट्या गेला. बिबट्याच्या वावरामुळे पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरेमधी केलटी पाड्यात प्रकाश भोईर आणि कुटुंबीय वास्तव्यास आहेत. हे संपूर्ण कुटुंब ‘आरे वाचवा’ आंदोलनाशी जोडलेले आहेत. आरे परिसरातील २०१९ मध्ये करण्यात आलेल्या बेकायदेशीर कत्तलीविरोधात मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रकाश भोईर यांच्या पत्नी प्रमिला भोईर यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. मंगळवारी भोईर कुटुंबाच्या घराच्या दारात मंगळवारी रात्री बिबट्या आला होता. भोईर कुटुंब घरात ‘आरे वाचवा’ आंदोलनाबाबत चर्चा करीत होते, तेवढ्यात प्रमिला भोईर यांचे घराबाहेर लक्ष गेले आणि त्यांना बिबट्याचे दर्शन घडले. बिबट्या अगदी दारातच आला आणि घरात डोकावून अगदी काही सेकेंदात निघून गेला.
बिबट्या गेल्यानंतर भोईर यांनी अंगणातील सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रीकरण तपासले. बिबट्याचा वावर त्यात कैद झाल्याने निदर्शनास झाले. ही चित्रफित सध्या समाज माध्यमावर दिसत आहे.
जंगल, झाडे, प्राणी आणि पक्षी हे आमचे कुटुंब आहे. बिबटे आणि इतर प्राण्यांचा आमच्या आजूबाजूला कायम वावर असतो. त्यामुळे आम्हाला कधीच बिबट्याची वा प्राण्यांची भीती वाटत नाही. आमच्या घरातशेजारी नेहमीच बिबट्या येतो आणि तो अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र पहिल्यांदाच बिबट्या अगदी दाराजवळ येऊन गेला. येथे मोठ्या प्रमाणावर वन्य जीवांचा वावर आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही. -प्रकाश भोईर ,रहिवासी, केलटी पाडा
आरेतील जैवविविधता अशी
अंदाजे ९ बिबटे
१६ प्रजातींचे प्राणी
७० प्रजातींचे पक्षी
८० प्रजातींची फुलपाखरे
३८ प्रजातींचे साप