लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त दुबईत ‘आशा@90’ या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रॉडवे म्युझिकलच्या धर्तीवर या शोचे आयोजन करण्यात आले असून तीन तास आशाताई आपल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
दुबईतील कोका कोला अरेना येथे ८ सप्टेंबर २०२३ रोजी आशा भोसले यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘आशा@90’ लाईव्ह कॉन्सर्ट या खास सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदी चित्रपसृष्टीतील तब्बल आठ दशकांतील आशाताईंच्या सुरेल कारकिर्दीला मानवंदना देण्याचा हा अनोखा प्रयत्न असल्याची माहिती या कॉन्सर्टचे आयोजक पीएमई एन्टरटेंमेंटचे सलमान अहमद यांनी दिली. या संगीत सोहळ्याच्या दिग्दर्शनाची धुरा खुद्द आशाताईंचे चिरंजीव आनंद भोसले यांनी घेतली असून संगीत संयोजन नितीन शंकर यांचे असणार आहे.
हेही वाचा… ३६४ लाचखोरांवरील कारवाई; शासन मंजुरीविना प्रलंबित
आशा भोसले यांची गाजलेली सदाबहार गाणी, गझल आदी गाणी सादर होणार आहेत. आशा भोसले यांची नात जनाई भोसले आणि प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले त्यांना साथ करणार असून ब्रॉडवेच्या धर्तीवर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी परेश शिरोडकर नृत्य दिग्दर्शन करणार आहेत. हा शो भारतात आणि जगभरात ठिकठिकाणी वर्षभर फिरणार असून आशाताईंची नव्वदी अशा वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येणार असल्याचे आनंद भोसले यांनी सांगितले.
या इंडस्ट्रीतील मी एकमेव मोगल…
वयाच्या दहाव्या वर्षापासून मी गाणी गायला सुरुवात केली. मी या क्षेत्रात कार्यरत असताना आता चित्रपट संगीत क्षेत्रात असलेले अनेकजण अगदी लहान होते. प्रत्येक दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, गायक – गायिका यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कधी शांतपणे बसते तेव्हा प्रत्येक गाणे, चित्रपट, त्यामागच्या आठवणी, माणसे असा सगळा पट सतत डोळ्यासमोर तरळत राहतो. मी नव्वद वर्षांची झाले असे तुम्हाला वाटत आहे, मला मात्र सगळ्या गोष्टी अगदी काल, परवा घडल्यासारख्या वाटतात. या इंडस्ट्रीतील पिढ्या न पिढ्या अनुभवणारी, एका मोठ्या काळाची मी एकमेव साक्षीदार आहे, असे सांगत आशाताईंनी आजही त्याच उत्साहाने रसिकांसमोर गाणी गाण्याचा आनंद वाटतो असे सांगितले.