मुंबई: मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे गुरुवारी रात्री अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मुख्य जलवाहिनी फुटली. मुंबई महानगरपालिकेने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. यामुळे वांद्रे – जोगेश्वरी परिसरात शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. परिणामी, नागरिकांचे हाल झाले.
वेरावली ३ जलाशयाच्या १८०० मी. मी. व्यासाच्या दोन इनलेटपैकी एक इनलेट मुख्य जलवाहिनीला अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ गुरुवार, ३० नोव्हेंबर २०२४ रोजी धक्का लागला व गळती सुरू झाली. जलवाहिनी दुरुस्तीच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात आले असून ते युद्धपातळीवर सुरू आहे.
हेही वाचा… चाळीस कोटींपेक्षा जास्त किंमत असूनही घरांना मागणी! जाणून घ्या खरेदी करणारे कोण…
यामुळे शुक्रवार, १ डिसेंबर रोजी सकाळी, एच पूर्व विभागातील सांताक्रुझ पूर्व (वाकोला, प्रभात कॉलनी इत्यादी), एच पश्चिम विभागातील सांताक्रूझ पश्चिम, खार पश्चिम, वांद्रा पश्चिम व के पश्चिम विभागातील अंधेरी पश्चिम (चार बंगला, जुहू कोळीवाडा, एस व्ही रोड इत्यादी) येथे कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.