मुंबई : जोगेश्वरीमधील एस. व्ही. मार्गावरील दिल्ली दरबार हॉटेलनजीकच्या ‘ई – हाय’ या बहुमजली इमारतीमध्ये बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जोगेश्वरी येथील २० मजली ‘ई – हाय’ टॉवरमध्ये लागलेली आग १५ ते २० व्या मजल्यादरम्यान पसरली होती. विजेच्या तारांच्या आणि विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्याने आगीचा भडका उडाला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन सकाळी ९ वाजून २४ मिनिटांनी क्रमांक एकची वर्दी देण्यात आली. इमारतीत अडकलेल्या काही रहिवाशांना अग्निशामकांनी सुरक्षितस्थळी हलविले. तसेच, अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आग विझविली.
हेही वाचा >>>मेट्रो स्थानकांत पाणी शिरल्याने कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड; काम संथगतीने करणेही महागात
या दुर्घटनेत मिनाज मेनन (४१), इम्रान मेनन (४०), इक्बाल चुनावाला (७१), नाझिमा चौहान (४७) जखमी झाले. तीन जखमींना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या एसबीएस आणि एका रुग्णाला के. जे. केअर रुग्णालयात हलविण्यात आले. इक्बाल चुनावाला यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. तर, अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.