लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः समाज माध्यमांवर ओळख झालेल्या युनायटेड किंगडममधील (युके) तरुणाने कुलाब्यातील ३० वर्षीय तरुणीला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. समाज माध्यमांवरील वधू-वर सूचक पेजवर दोघांची ओळख झाली होती. त्याने लग्न करण्याचे आश्वासन देऊन महागड्या भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली तरुणीची फसवणूक करण्यात आली.
तक्रारदार तरुणी मूळची आसाममधील रहिवासी असून कुलाबा येथे घरकाम करते. तरुणीचे फेसबुकवर खाते आहे. ती फेसबुकवरील युके मॅरेज या पेजमध्ये सहभागी झाली होती. युकेतील राहुल खन्ना नावाच्या तरुणाने व्हॉट्सॲपवरून तिच्याशी संपर्क साधला. दोघांंमध्ये अनेक दिवस व्हॉट्सॲपवरून बोलणे सुरू होते. त्यानंतर राहुल खन्नाने तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच युकेवरून महागडी भेटवस्तू विमानाद्वारे पाठवत असल्याचे तिला सांगितले. या तरुणीला ११ मार्च रोजी विमानतळावरून दूरध्वनी आला.
हेही वाचा… मुंबईतल्या व्यावसायिकाच्या पत्नीची अभिनेता साहिल खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार
विदेशातून आलेली भेटवस्तू घेण्यासाठी तिला बोलावण्यात आले. त्यानंतर निरनिराळी कारणं सांगून या तरुणीला विविध बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. तसेच भेटवस्तू न घेतल्यास ती परत युकेमध्ये येईल व त्यामुळे पोलीस मला पकडतील अशी भीती राहुल खन्नाने तिला घातली. त्यामुळे या तरुणीने सुमारे तीन लाख रुपये बँक खात्यांवर जमा केले. त्यानंतर अनेक दिवस भेटवस्तू न मिळाल्यामुळे अखेर तक्रारदार तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे समजले.
तिने तात्काळ याप्रकरणी कुलाबा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक, धमकावणे व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तरुणीच्या खात्यातून कोणत्या बँक खात्यामध्ये रक्कम गेली याबाबतची माहिती पोलिसांनी बँकेकडून मागवली आहे. याबाबत तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.