मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झालेल्या भाडेतत्वावरील बसगाड्या चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत बेस्ट उपक्रमात समाविष्ट करण्यात येत नाही, तोपर्यंत त्यांना ‘समान काम, समान दाम’ देण्यात यावे या मागणीसाठी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगारात गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता.
बेस्ट उपक्रमातील डागा ग्रुप, बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड, हंसा सिटी बस सर्व्हिसेस, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट लिमिटेड आदी कंपन्यांमार्फत बेस्टची सेवा देणाऱ्या कामगारांच्या विविध मागण्यांकडे बेस्ट प्रशासन, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व कर्मचारी एकत्र जमले होते.
हेही वाचा >>>Ratan Tata : रतन टाटांना अखेरचा निरोप देताना भाऊ जिमी टाटांना अश्रू अनावर, सावलीसारखा भाऊ हरपल्याचं मनात दुःख
बेस्ट उपक्रमात भाडेतत्वावर उपलब्ध केलेल्या बसगाड्यांवर कार्यरत असलेले बसचालक, वाहक व इतर कामगारांना सेवेत लागल्यापासून बेस्ट उपक्रमात कायम कामगार म्हणून समाविष्ट करावे, जोपर्यंत त्यांना बेस्ट उपक्रमात कायम स्वरुपी समाविष्ट केले जात नाही. तोपर्यंत त्यांना ‘समान काम, समान दाम’ या तत्त्वार वेतन द्यावे. कंत्राटी कामगारांनाही बेस्ट उपक्रमामधील समकक्ष, कायम व नियमित कामगारांना लागू असलेले वेतन व इतर सेवा सवलती तातडीने लागू कराव्या, कंत्राटी कामगारांनाही बेस्ट उपक्रमातील कायम कामगारांइतकेच सानुग्रह अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.