लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीत वारेमाप उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने आयोजित केलेला मोर्चा कोणत्याही परिस्थितीत शनिवारी काढण्यावर नेते मंडळी ठाम आहेत. भाजपने प्रत्युत्तरादाखल आयोजित केलेला मोर्चा स्थगित केलेला असला तरी ठाकरे गटाचा मोर्चा निघणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शनिवार, १ जुलै रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईकरांची तिजोरी रिकामी करणारे प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात हा मोर्चा असल्याचे ठाकरे गटाने जाहीर केले आहे. ऊन असो वा पाऊस मोर्चा निघणारच असा संदेश ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी समाजमाध्यमांवर टाकला आहे.
हेही वाचा… मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागामध्ये चार नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम
उपनगरातून बहुतांशी शिवसैनिक लोकलगाड्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात दाखल होणार आहेत. तर महिलांसाठी बसगाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मेट्रो सिनेमाच्या चौकात दुपारी ४ पूर्वी जमण्याचा निरोप सर्व शिवसैनिकांना देण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागातून साधारण २०० शिवसैनिक पोहोचतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा… ‘आयडॉल’कडून प्रवेश मुदतीत वाढ
मुंबई महापालिकेची मुदत संपून दीड वर्ष झाले असून महापालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे प्रशासक आहेत. प्रशासकीय राजवटीच्या काळात गेल्या दीड वर्षात मोठ्या प्रमाणावर पैशांची उधळपट्टी झाली असून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारही झाल्याचा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाने १ जुलै रोजी महानगरपालिका मुख्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. आमदार आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्यावतीने नियोजन सुरू असून महापालिका मार्गावर व्यासपीठ बांधण्याचे काम चालू असल्याने पोलिसांनी महापालिका मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे या मार्गावरील बसमार्गही वळवण्यात आले आहेत. बस क्रमांक १४,६६,६९ व १२६ हे डी. एन. रोड मार्गे महात्मा फुले मंडईकडून मेट्रोकडे परावर्तित करण्यात आले आहेत.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून एक अर्ध्या मिनिटाची ध्वनिचित्रफित प्रसारित करण्यात आली आहे. ‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’ अशी शिवसेनेची जुनी घोषणा यावेळी सूचक पद्धतीने देण्यात आली आहे. प्रशासकीय राजवटीच्या काळातील घोटाळे, महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट, मुंबईचे विद्रुपीकरण, मुंबईकरांच्या पैशातून सुरू असलेली जाहिरातबाजी याबाबत जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे त्यात म्हटले आहे.