मुंबई: गोवंडीमधील बैंगनवाडी परिसरातील झोपडपट्टीत शनिवारी पहाटे भीषण आग लागली होती. या आगीत १२ ते १५ झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
घाटकोपर – मानखुर्द जोडरस्त्यावरील बैंगनवाडी परिसरातील आदर्श नगर येथील झोपडपट्टीत शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास भीषण आग लागली. या परिसरात झोपडपट्टी आणि अनेक भंगाराची गोदामे आहेत. या गोदामांच्या पहिल्या मजल्यावर घरे असून तेथे अनेक जण वास्तव्यास आहेत. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ घराबाहेर धाव घेत अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत १० ते १५ झोपड्या आणि गोदामांना आगीचा विळखा पडला होता.
हेही वाचा >>>मुंबई, नागपूर, पुण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या; जाणून घ्या किती फेऱ्या…
यावेळी काही गॅस सिलेंडरचे स्फोटही झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत अखेर दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात गोदामांमधील साहित्य आणि घरातील सामानाचे नुकसान झाले. याप्रकरणी देवनार पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.