मुंबई : धारावी येथील ९० फीट रोडवरील अशोक मिल कंपाऊंड नजीकच्या तीन मजली इमारतीला मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत एकूण सहाजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान, १०८ रुग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य हाती घेतले. विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने आगीचा डोंब उसळला. या भडक्यात इमारतीतील लाकडी सामान पूर्णपणे जळून खाक झाले. तसेच, इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा – विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकीचा पेच; स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकराजचा परिणाम

हेही वाचा – ८० ते ९० जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही ; ‘मोठा भाऊ’ जास्त जागा लढवेल, फडणवीस, भाजपला आतापासूनच आठवण करा भुजबळ

आगीची वाढती तीव्रता लक्षात येताच अग्निशमन दलाकडून पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी आगीला क्रमांक दोनची वर्दी देण्यात आली. दरम्यान, मोठ्या प्रयत्नानंतर दुर्घटनेत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यात सलमान खान (२६), मनोज (२६), अमजद (२२), सल्लाउद्दिन (२८), सैदुल रहमान (२६), रफिक अहमद (२६) आदी सहाजण जखमी झाले. उपचारासाठी तात्काळ त्यांना नजीकच्या शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करत सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

Story img Loader