मुंबई : सांताक्रूझ परिसरातील ‘गलॅक्सी हॉटेल’मध्ये रविवारी दुपारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहेत.

सांताक्रुझच्या प्रभात वसाहतीनजिक असलेल्या गलॅक्सी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर रविवारी दुपारी दीडच्या सुमारास खोली क्रमांक १०३ मध्ये अचानक आग लागली. काहीच वेळात आगीची तीव्रता वाढली आणि ती वरच्या मजल्यापर्यंत पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचा तसेच अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, रुपाली कांजी (२५), किशन (२८) आणि कांतीलाल गोर्धन वारा (४८) या तिघांचा होरपळून मृत्यू झाला. तर, अल्फा वखारिया (१९), मंजुला वखारिया (४९) आणि मोहम्मद असलम (४८) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा >>>‘इंडिया’च्या मानचिन्हाचे गुरुवारी अनावरण; दोन दिवसांच्या बैठकीत समन्वयावर चर्चा

इमारतीला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महापालिका कार्यक्षेत्रात अग्निप्रतिबंधक कायद्यानुसार शासकीय कार्यालयांसह पंधरा मीटरपेक्षा अधिक उंच असलेल्या इमारतींसाठी अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविणे गरजेचे असते. तसेच औद्योगिक इमारत असल्यास त्यासाठी कोणत्याही उंचीची अट न ठेवता अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवणे अपरिहार्य ठरते. मात्र, गलॅक्सी हॉटेल १९६६ साली बांधण्यात आले असून त्याकाळी अग्निप्रतिबंधक यंत्रणेविषयी कायदे अस्तित्वात नव्हते. त्यामुळे संबंधित इमारतीमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आली नव्हती, अशी माहिती अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader