मुंबई: जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर सरकारविरोधात मराठा समाजात रोष वाढत असतानाच, मराठवाडय़ातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची बैठक येत्या मंगळवारी मंत्रालयात होत आहे. ही बैठक घेऊन मराठा समाजाचे पेटलेले आंदोलन शांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षीच्या अर्थसंकलपीय अधिवेशनात मराठा समाजास कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती स्थापन केली होती. जालना जिल्ह्यात झालेल्या प्रकरणामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समितीची तडकाफडकी बैठक सरकारने बोलावली आहे. या बैठकीत मराठा समाजाच्या महसुली व शैक्षणिक नोंदी, निजाम काळात संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्तऐवज व इतर कागदपत्रे, मराठा समाजातील लोकांची वंशावळ हे या समितीच्या बैठकीतले प्रमुख मुद्दे चर्चेले जाणार आहेत.