प्राजक्ता कदम

हॉटेल मालकाला धमकावल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश

एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने बनावट पिस्तुलाचा धाक दाखवत वांद्रे-कुर्ला संकुलातील एका हॉटेलमालकाला बंद केलेले हॉटेल पुन्हा उघडण्यास लावून जेवण देण्यास भाग पाडणाऱ्या दोघा तरुणांना उच्च न्यायालयाने धडा शिकवला आहे. हॉटेलमालकाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी या तरुणांनी आर्थिक नुकसान भरपाईची तयारी दाखवली होती. मात्र एवढय़ा सहजासहजी या तरुणांना सोडून दिले, तर त्यांना त्यांच्या चुकीचा वा कृत्याची जाणीवच होणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांना महिनाभर वर्सोवा किनारा स्वच्छतेच्या कामी लावले आहे. एवढय़ावरच न थांबता न्यायालयाने त्यांना टाटा कर्करोग रुग्णालयाला प्रत्येकी २० हजार रुपयांची मदतही देण्याचे बजावले आहे.

अंगदसिंग सेठी (२२) आणि कुँवरसिंग सेठी (२५) अशी या तरुणांची नावे आहेत. दोघांवर गेल्यावर्षी वांद्रे-कुर्ला संकुलातील एका हॉटेलमालकाने बनावट पिस्तुलाने धमकावल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र हॉटेलमालकाशी न्यायालयाबाहेर तडजोड झाली असून तो आपल्याविरोधात दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी तयार आहे, असा दावा करत दोन्ही तरुणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर या तरुणांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळी या दोघांनी नेमके काय केले याचा पाढा वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांच्या वतीने न्यायालयासमोर वाचण्यात आला. तसेच त्यांच्या याचिकेला विरोध केला. १० सप्टेंबर २०१७ रोजी दोघा तरुणांनी तक्रारदार हॉटेलमालकाला गाठले. त्यांनी त्याला बनावट पिस्तुलाचा धाक दाखवत बंद केलेले हॉटेल उघडण्यास लावून जेवण देण्यास लावले. जेवल्यानंतर दोघांनी तेथून पलायन केले. दोघा तरुणांच्या ‘स्टंट’गिरीविरोधात हॉटेलमालकाने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला.

या तरुणांचे कृत्य लक्षात घेता त्यांची याचिका फेटाळून लावण्याची विनंतीही पोलिसांकडून करण्यात आली. तर दोन्ही तरुण आणि हॉटेलमालक परस्पर संमतीने तक्रार मागे घेण्यास तयार झाले आहेत. शिवाय हॉटेलमालकाला झालेले नुकसान भरून देण्यासही दोन्ही तरुण तयार आहेत, अशी माहिती त्यांच्या वकिलाने न्यायालयाला दिली.

न्यायालयाने मात्र गुन्हा रद्द करण्यासाठी दोन्ही तरुणांकडून नुकसान भरपाईची दाखवण्यात आलेली तयारी स्वीकारण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. जर या तरुणांना केवळ नुकसान भरपाई देण्यास मान्यता देण्यात आली आणि त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात आला, तर मुलांच्या भवितव्यासाठी त्यांचे पालक नुकसान भरपाईची ही रक्कम फेडतील. परंतु त्याने कुठलाही हेतू साध्य होणार नाही. किंबहुना, दोन्ही तरुणांनी केलेल्या चुकीची शिक्षा स्वत: भोगावी अशी आमची इच्छा आहे. त्यावर दोन्ही तरुणांकडून समाजसेवा केली जाईल, असे सांगण्यात आले असता वर्सोवा किनारा स्वच्छतेसाठी अ‍ॅड्. फिरोझ शहा यांनी सुरू केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून दोघांनीही महिनाभर किनारा स्वच्छ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले, तसेच त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द केला.

Story img Loader