मुंबईः भारतीय पारपत्र मिळवून सिंगापूरला गेलेल्या नेपाळी महिलेला मुंबई विमातळावरून अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून महिलेने भारतीय पारपत्र मिळवले होते. गंभीर बाब म्हणजे या पारपत्राच्या माध्यमातून महिलेने यापूर्वी तीनवेळा विमान प्रवास केला आहे. विमानतळावर तैनात अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने या महिलेला पकडले. तिला सहार पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिष्णूमती शमन तमंग असे महिलेचे नाव असून तिच्याविरोधात तिने गेल्या दोन वर्षात तीन वेळा सिंगापूरला गेली आहे. दिल्ली, मुंबई व कोलकाता येथून तिने हा परदेशी प्रवास केल्याचे तिच्या पारपत्रांवरील नोंदवरून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणातील तक्रारदार गिता सचिन हेगडे ही अंधेरीतील मरोळ परिसरात राहत असून मुंबई पोलीस दलातील विशेष शाखा दोनमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. सध्या त्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर  इमिग्रेशन विभागात येथे कार्यरत आहेत. नुकतीच विमानतळावर काऊंटर क्रमांक ६७ जवळ येथील कामकाज पाहत होत्या. त्यावेळी विदेशातून येणार्‍या प्रवाशांचे इमिग्रेशन तपासणी करण्याचे काम सोपविण्यात आले होते. तपासणीसाठी तेथे एक महिला आली होती. ही महिला सिंगापूर येथून आली होती. चौकशीदरम्यान या महिलेवर संशय निर्माण झाल्याने तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान ती नेपाळी नागरिक असल्याचे उघडकीस आले. तिच्याकडे नेपाळी नागरिक असल्याचे काही कागदपत्रे सापडले होते. दहा वर्षांपूर्वी ती नेपाळहून भारतात आली होती. कोलकाता येथे वास्तव्यास असताना २०१९ साली तिला विकास छेत्री नावाच्या एका दलालाच्या माध्यमातून बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पारपत्र बनवून घेतले होते. या भारतीय पारपत्राच्या आधारावर तिला सिंगापूरचा व्हिसा मिळाला होता. या पारपत्रावरून ती तीन वेळा सिंगापूरला जाऊन भारतात परत आली होती. ११ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली, १५ जानेवारी २०२३ रोजी मुंबई आणि १ फेब्रुवारी २०२४ रोजी कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ती सिंगापूरला गेली होती. भारतीय पारपत्रासाठी अर्ज करताना तिने सादर केलेले सर्व कागदपत्रे बनावट होती. तपासात हा प्रकार उघडकीस येताच तिला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.

हेही वाचा – के उत्तर विभाग कार्यालय अद्याप सुरू नाही; निवडणूकीच्या तोंडावर घाईघाईत उदघाट्न

हेही वाचा – शपथ घेतली, चिंता मिटली; अजित पवारांना दिलासा, मालमत्तेवर टाच आणण्याचा आदेश रद्द

याप्रकरणी गिता हेगडे हिच्या तक्रारीवरुन सहार पोलिसांनी बिष्णूमती तमंग या नेपाळी महिलेविरुद्ध बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र बनवून  विदेशात गैरमार्गाने प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तिला दलाल विकास छेत्री याचाही सहभाग निष्पन्न झाल्यामुळे त्यालाही याप्रकरणात आरोपी करण्यात आले असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथक कोलकात्याला पाठण्यात येणार आहे. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A nepali woman traveled to singapore three times on an indian passport woman was arrested at mumbai airport mumbai print news ssb