मुंबई : इसवीसनापूर्वी तिसऱ्या शतकातील सम्राट अशोक यांचा नववा शिलालेख, इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील गांधारशैलीचे शिल्प आणि वास्तुकलेचे नमुने, अशा एकूण ४५ प्राचीन कला व इतिहासवस्तूंचे कायमस्वरूपी ‘बौद्ध कला दालन’ शुक्रवारपासून (२८ जुलै) मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) सुरू होत आहे. शनिवारपासून (२९ जुलै) ते जनतेसाठी खुले होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 या संग्रहालयात कैक वर्षांपासून तिबेटी (हीनयान) बौद्ध कलेचे वेगळे दालन आहेच, परंतु गांधार शैलीच्या आणि सम्राट अशोकाच्या काळातील कलावस्तू या संग्रहालयात विखुरलेल्या होत्या किंवा कडीकुलपात सुरक्षित होत्या. त्या सर्व आता एकत्रितपणे पाहायला मिळतील. संग्रहालयाच्या अन्य दालनांप्रमाणेच इथेही मराठी आणि इंग्रजी माहितीफलक असतील. महाराष्ट्रातील बौद्ध धम्मप्रसाराच्या खुणा असलेली लेणी पर्यटकांना त्यांतील वास्तुकला- सौंदर्यामुळेच भुरळ पाडतात. पण, या दालनात बौद्धकाळातील सुटी-सुटी शिल्पे किंवा अवशेष, काही तत्कालीन वस्तू यांचा समावेश आहे. इसवी सनपूर्व तिसरे शतक ते इसवी १६ वे शतक असा या दालनाचा कालपट आहे. 

सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेख मुंबईजवळच्या सोपारा येथे- म्हणजे तेव्हाचे शूर्पारक- सापडला असून, तो तत्कालीन ब्राह्मीसदृश लिपीत आहे. ‘धर्मकार्यातून काही विशेष निष्पन्न होत नाही, पण याच्या तुलनेत सदाचाराचे फळ चांगलेच मिळते’, असे सुचवणारा हा शिलालेख आहे. तथागत बुद्ध किंवा महत्त्वाच्या भिख्खूंच्या निर्वाणानंतर त्यांचे अवशेष जपण्यासाठी विशेष कलाकुसर असलेल्या कुप्या तयार केल्या जात, अशा सहा कुप्या या दालनात असून, त्यापैकी तीन स्फटिकाच्या आहेत. स्फटिकाच्या या कुप्यांपैकी दोन मराठवाडय़ातील पितळखोरे येथे सापडलेल्या आहेत. मुंबईतील या संग्रहालयाचे स्वरूप, ‘ लोकांनी उभारलेले, लोकांनी चालवलेले’ असे आहे. त्यामुळे दोराब टाटांसह अनेक धनिक- संग्राहकांनी भेट म्हणून दिलेल्या अनेक कलावस्तू येथे आहेत. कुलाबा येथील (रीगल सिनेमा चौकातील) हे वस्तुसंग्रहालय शनिवार- रविवारीही सशुल्क खुले असते.

परदेशांतीलही कलावस्तू

केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर परदेशांतील बौद्ध कलावस्तूंचा समावेश या दालनात आहे. थायलंड येथील एक बौद्ध हस्तलिखित पोथी, नेपाळ येथील दीपंकर बुद्ध मूर्ती अशा अन्य पौर्वात्य देशांतील कलावस्तू येथे असून, बौद्ध धम्माचा प्रसारमार्ग त्यातून प्रतीत होतो. पद्मपाणी बोधिसत्वाची आठव्या-नवव्या शतकातील मूर्ती तर काश्मीरमधील आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A new gallery of buddhist art at the mumbai museum ysh
Show comments