मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील २४ विभाग कार्यालयांना बाजूला ठेऊन पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजविण्याची संपूर्ण जबाबदारी रस्ते विभागाने आपल्याकडेच घेतली होती. मात्र या निर्णयाला विरोध होऊ लागला असून त्याची दखल घेत रस्ते विभागाने नवीन आदेश जारी केले आहेत. नव्या आदेशानुसार खड्डे बुजवण्याच्या प्रक्रियेत आता सहाय्यक आयुक्तांनाही सामावून घेण्यात येणार आहे.
खड्डे बुजवण्यासाठी यंदा रस्ते विभागाने नवीन कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्यानुसार केवळ ६ मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्यांची जबाबदारी विभाग कार्यालयांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील बहुतांशी सर्व रस्त्यांची जबाबदारी रस्ते विभागाकडे देण्यात आली आहे. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी २२७ अभियंत्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून प्रत्येक अभियंत्याला स्वतंत्र क्रमांक देण्यात आला आहे. मात्र सर्वसामान्य नागरिक तक्रार घेऊन विभाग कार्यालयात जातात. परंतु या नव्या निर्णयामुळे पावसाळ्यात गोंधळ उडण्याची शक्यता अधिक होती. ही बाब सहाय्यक आयुक्तांनी महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आता रस्ते विभागाने नवीन परिपत्रक काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा >>>राहुल नार्वेकरांच्या क्रांतीकारक निर्णय घेण्याच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “ते काय…”
यंदा विभाग कार्यालयांकडे खड्ड्याची जबाबदारी नसल्यामुळे रस्ते विभागाने प्रत्येक प्रभागातील नागरिकांना तक्रार करता यावी याकरीता एक स्वतंत्र मदत क्रमांक दिला आहे. तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक केली आहे. मात्र या २२७ अभियंत्यांनी दररोज किती खड्डे बुजवले त्याचा अहवाल सहाय्यक आयुक्तांना द्यावा, असे आदेश आता देण्यात आले आहेत. विभागांची जबाबदारी साहाय्यक आयुक्तांवर असल्यामुळे त्यांना खड्ड्याबाबतचा अहवाल द्यावा अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक आयुक्तांकडून आलेल्या खड्ड्यांच्या तक्रारीचेही निवारण करावे, असे निर्देशही रस्ते विभागाने अभियंत्यांना दिले आहेत.