मुंबई: लांबपल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा किंवा जेवण,, नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, शिळा नाश्ता, खाद्यपदार्थांचे अवास्तव दर, याचबरोबर संबंधित हॉटेलमधील कर्मचारी व मालकांची वर्तणूक आदी तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामुळे हॉटेल-मोटेलना परवानगी देताना यापुढे नवीन कडक धोरण स्वीकारले जाईल, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

लांबपल्ल्याच्या प्रवासामध्ये एसटी बस ज्या हॉटेल-मोटेलवर थांबतात, तेथे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवा – सुविधाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. प्रवाशांच्या तक्रारीद्वारे संबंधित हॉटेलवर दंडात्मक कारवाईसह त्यांचा थांबा रद्द करण्याचे नवीन धोरणा राबवले जाणार आहे. तसेच ज्या विभागात अशा हॉटेल-मोटेल संदर्भात तक्रार येतील, त्या विभाग नियंत्रकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद या नव्या धोरणात करण्यात येणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढाएसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजनासाठी एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी, असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. सुमारे १० हजार कोटी संचित तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, वाहन चाक खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते.

कर्मचाऱ्यांची देणी, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते, कामगार करारातील प्रलंबित देणी यासाठी महामंडळाला पैशाची गरज आहे. याबरोबरच महामंडळाला इंधन,वस्तू व सेवा पुरविणाऱ्या संस्थांची थकीत देणी या सर्व घटकांचा विचार करून एसटी महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळते, किती खर्च येतो, तसेच किती देणी बाकी आहेत या सर्वांचा लेखा-जोखा मांडणारी एक श्वेतपत्रिका काढणे अत्यंत आवश्यक आहे. यातून एक आर्थिक शिस्त निर्माण करा, अशी सूचना सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला केली.

तज्ञांची लवकरच नियुक्तीएसटी प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा असून एसटी महामंडळातील अधिकारी व प्रशासनाला मार्गदर्शन करण्यासाठी अशा तज्ञांची नियुक्ती करावी, असेही सरनाईक यांनी सूचित केल. बांधकाम, वाहतूक, कामगार, आर्थिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी प्रत्येकी एक अशा प्रकारे पाच तज्ञांची नियुक्ती लवकर एसटी महामंडळातर्फे करण्यात येणार आहे.

धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस मेडिक्लेम योजना

कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर सर्व कर्मचाऱ्यांना एकाच छताखाली वैद्यकीय सेवा – सुविधा व वैद्यकीय चाचण्या करून मिळतील अशी ‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजना धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू करावी, असे निर्देश सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले.