मुंबई : भारतात ‘जेएन १’ या ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराचे आतापर्यंत २१ रुग्ण आढळले असून यात गोव्यामध्ये १९ तर महाराष्ट्र व केरळात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जेएन १ हा विषाणू घातक नसल्याचे म्हटले असले तरी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये करोना विषयक मॉक ड्रिल घेतले आहे. मात्र करोना चाचण्यांची कमतरता आणि फ्लू साथीच्या पार्श्वभूमीवर करोनाचा सामना करण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे आहे.
जागतिक आरोग्य संघटना तसेच तज्ज्ञांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, की आगामी काळातही करोनाबरोबरच आपल्याला राहावे लागणार आहे. त्यानुसार करोनाच्या विषाणूंचे वेगवेगळे उपप्रकार उत्पन्न होत राहतील व त्याचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. ओमायक्रॉनच्या वेळी सावधानतेचा इशारा देण्यात आला होता परंतु हा सौम्य प्रकारचा विषाणू प्रकार असल्याने त्याचा फारसा त्रास रुग्णांना झाला नाही. आता जेएन १ हा ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराचा विषाणू भारतात आढळून आला असला तरी तो सौम्य प्रकारातील असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तथापि हा किती वेगाने पसरू शकतो याबाबत अद्यापि निश्चित माहिती नसल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने कोविड चाचण्या करण्यास प्राधान्य दिले आहे. बुधवारपर्यंत ५३० चाचण्या करण्यात आल्या असून यात ३८० रॅपिड चाचण्या करण्यात आल्या तर १७२ आरटीपीसीआर चाचण्या केल्या आहेत. आरोग्य विभागाकडे सुमारे साडेतीन लाख आरटीपीसीआर किट्स आहेत. तसेच सुमारे १७ रॅपिड अँटिजेन किट्स आहेत. आरोग्य यंत्रणेने सर्व जिल्ह्यांत १७ डिसेंबर रोजी मॉक ड्रिल केले असून उपलब्ध प्राणवायूपासून आवश्यक सर्व गोष्टींचा आढावा घेतल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा – बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा, विशेष मोहीम राबविणार
तथापि खाजगी क्षेत्रातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शहरी भागात करोना चाचणी सुविधा तसेच फ्लूची साथ या पार्श्वभूमीवर अशा संशयित रुग्णांवर उपचार करणे एक आव्हान आहे. करोना काळातील अनुभवाचा वापर करून रुग्णांवर उपचार करावे लागत असून आरोग्य विभागानेही इन्फ्लुएंझा सारखे आजार व तीव्र श्वसनासंदर्भातील आजार असलेल्या रुग्णांचे सक्षमपणे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या सर्वेक्षणात आढळलेल्या रुग्णांच्या करोना चाचणी करण्यास सांगितले आहे.
साथरोग तज्ज्ञ डॉ. पराग देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, आलेल्या रुग्णाची ऑक्सिजनची पातळी कमी असेल, फुप्फुसाचा त्रास आणि फ्लू सारखा ताप असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रुग्णाला करोना रुग्ण समजून उपचार करता येतील. परंतु सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत असल्याने या नव्या विषाणूबाबत घाबरण्याचे कारण नाही, असेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले.
कांदिवली येथील डॉ. नीता सिंगी यांच्या म्हणण्यानुसार सध्या फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून रुग्णांचा ताप बराच काळ म्हणजे सहा ते सात दिवस राहात असल्याचे दिसते. काही रुग्णांमध्ये दहा दिवसांपर्यंत ताप राहात असून रुग्ण बरा होण्यास तीन आठवड्यांचा कालावधी लागत आहे. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये बरे होण्यास वेळ लागत आहे. खराब हवामानामुळे वारंवार संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असले तरी यापैकी फारच थोड्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते असेही डॉ. नीता म्हणाल्या.
करोना काळातील अनुभवाच्या आधारे सध्या फ्लूमुळे दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करताना मदत होते. यात रुग्णांची ऑक्सिजन पातळी, फुप्फुसाची क्षमता व तापाची लक्षणे याचा पहिल्या टप्प्यात विचार करून उपचार केले जातात. तसेच कोविड चाचणी करून रुग्णनिश्चिती केली जात असली तरी पुन्हा वाढता करोना हे खाजगी क्षेत्रातील डॉक्टरांपुढे उपचारासाठी आव्हान असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.