मुंबई : ग्रँट रोड रेल्वे स्थानकानजीकच्या स्लेटर मार्गावरील रुबिनिस्सा मंजिल या चार मजली इमारतीच्या छताचा भाग शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य तीनजण जखमी झाले. तसेच, राडारोड्याखाली अद्यापही काहीजण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रुबिनिस्सा मंजिल ही इमारती जीर्ण झाली असून म्हाडाने या धोकादायक इमारतीला पूर्वी नोटीस बजावली होती. शनिवारी सकाळी इमारतीच्या छताच्या काही भाग, तसेच तिसऱ्या व दुसऱ्या मजल्यावरील सज्जाचा भाग अचानक कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले. दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने ११ वाजून ६ मिनिटांनी क्रमांक एकची वर्दी घोषित केली. तसेच, राडारोड्याखाली अडकलेल्या चार जखमींना बाहेर काढण्यात आले आहे.

जखमींना तात्काळ नजीकच्या भाटिया रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, जखमींपैकी एका महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तसेच, अन्य तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राडारोड्याच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही काहीजण अडकल्याची शक्यता असल्यामुळे अग्निशामकांकडून अद्ययावत यंत्राच्या साहाय्याने बचावकार्य करीत आहेत. दरम्यान, सात ते आठ रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अडकले आहेत. त्यांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत आहेत.