मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम पश्चिम’ विभागामध्ये झिकाचा एक रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. हा रुग्ण सापडलेल्या परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील चेंबूर परिसरामधील एका वृद्ध व्यक्तीला झिकाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णाला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या व्यक्तीची प्रकृती आता स्थिर आहे. या व्यक्तीची माहिती घेण्यात आली असून त्याच्या घरातील काही व्यक्ती परदेशातून आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ही वृद्ध व्यक्ती राहत असलेली सोसायटी आणि आसपासच्या सोसायटींमधील नागरिकांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांच्यामध्ये झिकाचा कोणताही रुग्ण आढळला नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये झिकाचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये जुलै २०२१ मध्ये आढळला होता. एका ५० वर्षीय महिलेला याची लागण झाली होती.
हेही वाचा >>>आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी नोटिसची वेळ संपली, कारवाई कधी? राहुल नार्वेकर म्हणाले…
काय आहे झिका आजार
एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा झिका सौम्य स्वरुपाचा आजार आहे. या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात.
हेही वाचा >>>पोलिसाला चावणारा आरोपी अटकेत
काळजी कशी घ्याल?
हा आजार संसर्गजन्य नाही.
झिका विषाणू असलेल्या व्यक्तीला चावलेला डास अन्य व्यक्तीला चावला तर त्याला झिकाची लागण होते.
मधूमेह, उच्च रक्तदाब आदींसारख्या समस्या असलेल्यांनी प्रवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्रवास करून आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.