मुंबई: शीव येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. वापरलेली पाण्याची रिकामी बाटली या यंत्रामध्ये टाकताच तिचा अक्षरशः चिमूटभर भुगा होणार आहे. त्यामुळे एकंदरीत कचऱ्यामधली बाटल्यांची संख्या कमी झाल्याने त्या कचऱ्याचे विलगीकरण व व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होणार आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांचा मशीनद्वारे करण्यात आलेल्या भुग्याचा पुनर्चक्रीकरणासाठी वापर होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण आणि त्यांची आप्त मंडळी ही पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा पॅक बंद असणाऱ्या व सहजपणे उपलब्ध असणाऱ्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर करतात. बाटलीतले पाणी संपल्यानंतर त्या बाटल्या कचऱ्यात जातात. मात्र या बाटल्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारांमुळे कचराकुंडीतली खूप जागा या बाटल्यांनी व्यापलेली असते. तसेच यामुळे कचऱ्याचे विलगीकरण करणेही तुलनेने कठीण होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन कार्यान्वित करण्याचे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार लोकमान्य टिळक रुग्णालयात नुकतेच प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. जोशी यांनी सांगितले की, रुग्णालयात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र अनेकदा रुग्ण व त्यांचे आप्त बाटलीबंद पाणी पिण्यास प्राधान्य देतात. यामुळे रुग्णालयातील एकंदरीत कचऱ्यात या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचे प्रमाण लक्षणीय असते. रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांद्वारे रोज गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यामधील प्लास्टिक बाटल्या आता वेगळ्या करण्यात येत असून त्यात पिण्याच्या पाण्यासह शीतपेयांसारख्या अन्य प्लास्टिक बाटल्यांचाही समावेश समावेश आहे.
लोकमान्य टिळक रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन बसविण्यात आल्यामुळे कचरा हाताळणी आणि त्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर कचरा पुनर्वापरास योगदान देण्यास आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठीही हे यंत्र प्रभावी ठरेल. भुगा केलेल्या कच-याचा पुनर्वापर करून त्यापासून फॅब्रिक्स, टोप्या, शूज, फोम, रिफ्लेक्टर जॅकेट, मोल्डेड फर्निचर आदी तयार करणेही शक्य होईल, अशी माहितीही डॉ. जोशी यांनी दिली.