मुंबई : वरळी पोलीस वसाहतीतील अभ्यासिकेत गफळास घेऊन २७ वर्षीय पोलीस शिपायाने रविवारी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी पोलीस शिपायाने त्याच्या एका मैत्रिणीला गळफास घेत असल्याचे छायाचित्र पाठवले होते. प्रेयसीशी झालेल्या भांडणानंतर त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
इंद्रजीत साळुंखे (२७) असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. तो स्थानिक सशस्त्र पोलीस दलात भोईवाडा येथे कार्यरत होता. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी येथील पोलीस तरण तलावाशेजारी असलेल्या अभ्यासिकेच्या खिडकीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
हेही वाचा – उपराजधानीत जानेवारी २०२४ मध्ये राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद; विशेषत: काय? जाणून घ्या…
प्राथमिक तपासणीत मृत पोलिसाचे २३ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. रविवारी तो प्रेयसीला वरळी सी फेस येथे भेटला त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर साळुंखेने प्रेयसीला दादर रेल्वे स्थानकावर सोडले. तेथे त्यांनी मोबाईल तपासला असता प्रेयसीने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. त्यानंतर प्रेयसीच्या मैत्रिणीला गफळास घेत असलेले छायाचित्र त्याने पाठवले. तसेच आत्महत्या करत असल्याचा संदेश पाठवला. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी मृत पोलिसाच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवला असून त्यांची कोणाविरोधात संशय व तक्रार नसल्याचे सांगितले आहे.