मुंबई : मराठी असल्याने मुलुंडमध्ये महिलेला जागा नाकारल्याच्या घटनेचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. सर्वच राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतली. मराठीची गळचेपी करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. राज्यात असे पुन्हा घडल्यास गालावर निश्चितपणे वळ उठतील, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. राज्य सरकारनेही आपला धाक दाखविला पाहिजे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले असून कडक कायदा करण्याची मागणी मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे.
शिंदे-भाजप सरकार आता कोणती कारवाई करणार, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केला, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित महिलेची भेट घेऊन राज्य सरकार पाठीशी असल्याची ग्वाही दिली आहे. मराठी असल्याने देवरुखकर यांना मुलुंडमध्ये जागा नाकारल्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले असून सर्वसामान्यांनीही समाजमाध्यमांवर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. देवरुखकर यांची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी दम दिल्यावर सोसायटीच्या सचिवांनी माफीही मागितली. अन्याय दिसेल, तिथे मनसेची लाथ बसलीच पाहिजे, असे सांगत राज ठाकरे यांनी सोसायटीच्या सचिवाला अद्दल घडविल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांचे अभिनंदनही केले.
पिता – पुत्राला अटक
मुलुंड परिसरात कार्यालयासाठी जागा नाकारल्याने तृप्ती देवरुखकर यांनी गुरुवारी मध्यरात्री मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर या दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
जितेंद्र आव्हाड यांची टीका
ठाणे : मला वाटते हे आजचे प्रकरण नाही. मराठी माणूस सहन करतो. त्यामुळेच अशा प्रवृत्तींची हिमंत वाढते. आपण पहिल्यापासून कणखर भूमिका घ्यायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. मतांच्या गणितात हा समूह दुखावेल. तो समूह नाराज होईल, असे राजकीय पक्ष म्हणत गेले अन् त्यातून मराठी माणसाची टक्केवारी कमी होत गेली, असा दावाही त्यांनी केला.