मुंबई : पश्चिम रेल्वेवरील धावत्या वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासनीसाला एका प्रवाशाने मारहाण केली. त्यानंतर, याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, तिकीट तपासनीसाच्या दाढी आणि पगडीला हात लावल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करून प्रवाशाला घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली.
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट – विरार वातानुकूलित लोकलमध्ये गुरुवारी मुख्य तिकीट निरीक्षक जसबीर सिंग तिकीट तपासणी करीत होते. यावेळी प्रवासी अनिकेत भोसले यांनी सिंग यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. यात भोसले यांचा हात सिंग यांच्या दाढी आणि पगडीला लागला. या घटनेनंतर भोसले यांनी आपली चूक कबूल करून लेखी माफीनामा दिला. मात्र, कर्तव्यावरील तिकीट तपासनीसाला मारहाण करणे गंभीर बाब असून, याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू केला. लोकलमधील मारहाणीची ध्वनिचित्रफित समाज माध्यमाद्वारे सर्वत्र प्रसारित झाली.
हेही वाचा >>>मुलीच्या पोटातून काढला केसांचा गुंता; वाडिया रुग्णालयात यशस्वी उपचार
या मारहाणीमध्ये शीख धर्मिय सिंग यांच्या दाढी, पगडीला हात लावण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे शीख समुदायांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्या प्रवाशाला घरात घुसून मारेन, अशी धमकी देणारा एका शीख तरूणाची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली. मात्र, हे प्रकरण शांत करण्यासाठी इतर शीख समुदायातील तरुणांकडे अनिकेत भोसले आणि त्यांच्या परिवारातील सदस्य गेले. त्यावेळी शीख समुदायातील तरूणांनी अनिकेत भोसले याला मुलुंड येथील गुरुद्वारामध्ये नेले. येथे भोसले नतमस्तक होऊन, संपूर्ण शीख समुदायाची माफी मागितली. तसेच भोसले यांच्या परिवारातील सदस्यांनीही माफी मागितली.