पाच कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने छत्तीसगडमधून एका आरोपीला नुकतीच अटक केली. महाराष्ट्र रेल्वे गुड क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डाची रक्कम बनावट धनादेशाद्वारे हस्तांतरित करण्यात आली होती. त्याप्रकरणी या आरोपीला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी बँकेतील २५ लाख रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>Video: “सोनू निगम स्टेजवरून उतरत असताना…”, ठाकरे गटाच्या नेत्या सुप्रदा फातर्पेकरांनी मागितली माफी; सांगितला धक्काबुक्कीचा घटनाक्रम!

जगजोत सिंह अमरिक सिंह (२९) असे अटक आरोपीचे नाव असून तो झारखंडमधील गोलमुरी येथील रहिवासी असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. गुन्ह्यांत वापरण्यात आलेले बनावट ओळखपत्र आरोपीने तयार केल्याचा संशय आहे. त्यासाठी नवी मुंबईतील बनावट पत्ता देण्यात आला होता. आरोपीने हे ओळखपत्र कोठून तयार केले याबाबत आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा >>>पृथ्वी शॉच्या अडचणी वाढू शकतात; जामीन मिळताच सपना गिलने दाखल केले गंभीर गुन्हे

या प्रकरणात तत्कालिने सहाय्यक कामगार आयुक्त अशोक डोके यांनी तक्रार केली होती. डोके यांच्याकडे महाराष्ट्र रेल्वे गुड क्लिअरिंग ॲण्ड फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. या बोर्डाच्या खात्यातून बनावट धनादेशाद्वारे पाच कोटी रुपये काढण्यात आल्याची तक्रार डोके यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. या बोर्डाअंतर्गत असंरक्षित कामगार कल्याणाचे काम सुपूर्द करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व कल्याण निधी बोर्डाकडे असतात. ही रक्कम एका राष्ट्रीकृत बँकेच्या खात्यात जमा करण्यात आली होती. गेल्या महिन्यात बोर्डाचा लेखापाल व त्याचा सहकारी बँकेच्या मशीद बंदर येथील शाखेत गेले. त्यावेळी पासबूक नोंदीनुसार खात्यात पाच कोटी सहा लाख रुपये कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती देण्यात आली. ७ जानेवारी ते २ मार्च २०२१ या कालावधीत बनावट धनादेशाद्वारे ही रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम हस्तांतरित करण्यासाठी वापरण्यात आलेले धनादेश कोणालाच दिले नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. आठ बनावट धनादेशाद्वारे ही रक्कम मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली होती. तेथील कंपन्या, शिक्षण संस्थांची बँक खाती त्यात पाच कोटींची रक्कम जमा झाली होती. हा व्यवहार करण्यापूर्वी बँक खात्याशी जोडलेले मोबाइल सिमकार्ड बंद करण्यात आले होते. तसेच बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने नवीन सिमकार्ड घेऊन धनादेशाद्वारे बँक खात्यातून रक्कम काढण्यात आली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A resident of jharkhand was arrested in connection with fraud of rs 5 crore mumbai print news amy