मुंबईः अमेरिकन वाणिज्य वकिलातीला धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली असून ई-मेल पाठणारा तरूण उच्चशिक्षित आहे. तसेच स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्याने धमकीचा ई-मेल पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने कंपनीच्या अधिकृत ई-मेलवरूनच धमकीचा ई-मेल पाठवला होता. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तींचा जबाब नोंदवला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माझी जाहीर माफी मागावी अन्यता मी सर्व अमेरिकन वकिलाती उडवीन, अशा आशयाची धमकी देण्यात आली होती. वकिलातीला शनिवारी (१०फेब्रुवारी) हा ई-मेल प्राप्त झाला होता. मी अमेरिकेचा कुख्यात नागरिक आहे. माझ्यावर अमेरिकेत १९ प्रकरणे प्रलंबित आहेत. बायडन यांनी माझी जाहीर माफी मागावी, अन्यथा सर्व वकिलाती उडवून देईन. मी अनेक अमेरिकन नागरिकांना मारण्याचा कट रचला असल्याचेही या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा – झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी दीड हजार कोटी खर्च करणार
याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी स्वतः तक्रार करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सायबर पोलीस व गुन्हे शाखेच्या मदतीने बीकेसी पोलीस अधिक तपास करीत होती. याप्रकरणी ई-मेल पाठवणाऱ्याची ओळख पटली असून तो कोलकाता येथील रहिवासी आहे. तो जैव-रासायनिक क्षेत्रातील पदवीधर आहे. त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते. पण त्याच्या स्थितीत कोणताही बदल न झाल्यामुळे तो पुन्हा भारतात परत आला. त्याच्या वडिलांनी आयआयटीमधून शिक्षण घेतले असून आई वकील आहे.