तंत्रज्ञानामुळे परिस्थिती झपाटय़ाने बदलत असून पालकत्वाचे संदर्भ बदलत आहेत. या बदलणाऱ्या परिस्थितीतही मुलांमध्ये लहान वयातच मूल्यांची रुजुवात करणारे पालकत्व हेच खरे आदर्श पालकत्व असल्याचा सूर पालकत्वावर आयोजित एका चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.
‘हिदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड’च्या ‘सर्फ एक्सेल’तर्फे आयोजित या चर्चासत्रात बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुपम सिबल, एचआर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. इंदू साहानी, बालमानसोपचारतज्ज्ञ रूपल पटेल, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, हिंदुस्थान युनिलिव्हरच्या कार्यकारी संचालक (होम केअर) प्रिया नायर सहभागी झाले होते. निवेदक मिनी माथूर होते.
आपल्या सर्वाच्या वागण्या-बोलण्यात खूप आक्रमकता आली आहे. अनुकंपेची भावना क्वचितच एकमेकांशी बोलताना आपण दाखवितो. मुलांमध्ये नेमकी हीच भावना रुजविण्याची गरज असल्याचे सोनाली बेंद्रे हिने या वेळी सांगितले. मुलांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. त्यामुळे, पालकांच्या चांगल्या गोष्टीही त्यांच्या लक्षात राहतात. पालकांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून त्यांच्यासमोर आदर्श उभे करावे. मूल्यांची रुजवण आपोआप होईल, अशी मांडणी डॉ. सिबल यांनी या वेळी केली. तर कुटुंबामध्ये आजी-आजोबा असल्याचाही चांगला परिणाम मुलांच्या वागण्यात होत असतो. त्यामुळे, त्यांचा होता होईल तितका सहवास मुलांना मिळू द्यावा, असे डॉ. साहानी यांनी स्पष्ट केले. मुलांमध्ये मुल्यांची रुजवण व्हायची असेल तर पालकांनी त्यांच्याशी चांगला संवाद साधला पाहिजे, अशी रूपल पटेल यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A seminar held on parenting