गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘लतांजली’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द गायक-गायिका, वादक कलाकार असे ५० कलावंत आणि सत्तर-ऐंशीच्या दशकात ज्या नायिकांना लता मंगेशकर यांचा आवाज लाभलेल्या अभिनेत्री राखी यांच्यापासून आताच्या पिढीतील काजोलपर्यंत १२ अभिनेत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा >>>मुंबई:प्रेयसीसोबत फिरणाऱ्या तरुणाची भरस्त्यात हत्या
आपल्या आवाजाने प्रत्येक भारतीय रसिक मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या लता मंगेशकर यांचा ६ फेब्रुवारी रोजी प्रथम स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाचे औचित्य साधून मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ॲड. आशिष शेलार यांनी ‘मेराक इव्हेंट’ यांच्या सहयोगाने ‘लतांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ६ फेब्रुवारी रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध गायिका साधना सरगम, बेला शेंडे, शरयू दाते, संपदा गोस्वामी, निरुपमा डे, निवेदक संदीप पंचवटकर, आर. जे. गौरव आणि नामवंत वादक यांच्यासह एकूण ५० कलावंत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय अभिनेत्री राखी, हेमा मालिनी, आशा पारेख, मौसमी चटर्जी, पद्मिनी कोल्हापूरे, नितू सिंग, बिंदू, रिना रॉय, पुनम ढिल्लॉँ, रवीना टंडन, राणी मुखर्जी आणि काजोल यांचीही खास उपस्थिती असणार आहे. संगीतकार आनंदजी आणि प्यारेलाल हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा >>>मुंबई: पहिली मेट्रोसारखी लोकल पश्चिम रेल्वेवर
मुंबई पोलीस बॅण्डतर्फे श्रध्दांजली
‘लतांजली’ कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी षण्मुखानंद सभागृहाच्या चौकात मुंबई पोलीस बॅण्डतर्फे दीदींची काही निवडक गाणी वाजवून श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे.