मुंबई : रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असून, त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी पुढील एक महिना विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही विशेष मोहीम १२ ते २५ फेब्रुवारी आणि १५ ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट काढून रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य, पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या प्रथम श्रेणीसह द्वितीय श्रेणी डब्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांना धक्काबुक्की प्रवास सहन करावी लागते. परिणामी, याबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. धावत्या वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात तिकीट तपासणी करण्याची सूचना प्रवाशांकडून करण्यात आली. त्यानंतर, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यासह आता भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह वाणिज्य अधिकारी आणि विभागीय कार्यालयातील वरिष्ठ पर्यवेक्षकांचे पथक आवश्यकतेनुसार आरपीएफ, दक्षता आणि इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना पाचरण करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – मुंबईतील बेघर मुलांसाठी पहिली ‘सिग्नल शाळा’, चेंबूरमध्ये अमर महल येथे कंटेनरमध्ये शाळा
रेल्वे मंडळाकडून भारतीय रेल्वेमधील प्रत्येक विभागाला दिलेल्या सूचना
– पीआरएस तिकिटांच्या तपासणीदरम्यान प्रवाशांचे ओळखपत्र तपासणे, सवलतीचे तिकीट असल्यास त्याबाबतचे वैध पुरावा तपासून घ्यावा.
– आरक्षण केंद्रावर दलालाच्या हालचाली रोखण्यासाठी पथके तयार करून, तपासण्या कराव्यात. तसेच आपत्कालीन कोट्याचा गैरवापर होऊ नये, याबाबत सतर्क राहावे.
– कॅटरिंग कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांकडे योग्य शुल्क घेत आहेत आणि त्यांना योग्य पावती दिली जाते, याची तपासणी करावी. तसेच अनधिकृत विक्रेत्यांना रेल्वेगाड्यांमध्ये बंदी घालावी. खाद्यपदार्थांच्या स्टाॅलवर दराचे फलक आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची विक्री केली जाते का, हे तपासावे.
हेही वाचा – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू
विनातिकीट प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. रेल्वेचे तिकीट दर हे खूपच माफक आहेत. त्याचप्रमाणे युटीएस व इतर सोयींद्वारे त्वरित तिकीट मिळण्याची व्यवस्थाही केली गेली आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट किंवा पास काढून प्रवास करावा. – डाॅ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे