मुंबई : लहान मुलांमधील क्षयरोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, त्यांना योग्य वेळेत दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शिवडी क्षयरोग रुग्णालयात आता लहान मुलांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे. पुढील महिन्याभरात हा कक्ष सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या शिवडी क्षयरोग रुग्णालयात मुंबईसह राज्यभरातून लोक उपचारासाठी येतात. क्षयरोग रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा पुरविण्याकडे सध्या महानगरपालिकेकडून भर देण्यात येत आहे. रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या १० खाटांच्या कक्षाचे काम सुरू असताना आता लहान मुलांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे. हा कक्ष विशेषकरून ड्रग रेझिस्टंट आणि ड्रग सेन्सिटिव्ह रुग्णांसाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. या कक्षासाठी दोन स्वतंत्र डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
हेही वाचा – मुंबई : १५ हजार गृहप्रकल्पांवरील महारेराच्या नोटिशीकडे विकासकांचा कानाडोळा!
लहान मुलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या कक्षामुळे तीन ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना फायदा होणार आहे. सध्या या कक्षात शून्य ते तीन वयोगटातील मुलांवर उपचार होणार नसले तर त्यांनाही उपचार देता यावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे शिवडी, क्षयरोग रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नम्रता कौर म्हणाल्या.