मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत मुंबईत ८ मार्च रोजी होणाऱ्या दोन नाटकांवर महिला प्रेक्षकांना खास सवलत मिळणार आहे. ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाचा खास महिला विशेष प्रयोग सादर होणार आहे, तर सध्या गाजत असलेल्या आणि झी नाट्य गौरव पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकाच्या प्रयोगाला महिला प्रेक्षकांना एका तिकिटावर दुसरे तिकीट मोफत मिळणार आहे.
‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाचा पहिला प्रयोग २१ डिसेंबर २०१८ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे झाला होता. आजतागायत प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या या नाटकाच्या सुरूवातीच्या प्रयोगातील कलाकार आणि व्यक्तिरेखांमध्ये बदल करण्यात आला. सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये पुष्कर श्रोत्री यांनी नवऱ्याची भूमिका, डॉ. श्वेता पेंडसे यांनी पत्नीची भूमिका आणि सतीश राजवाडे यांनी इन्स्पेक्टर घारगे यांची भूमिका ताकदीने साकारली होती. आत्ताच्या प्रयोगांमध्ये डॉ. श्वेता पेंडसे या इन्स्पेक्टर घारगे ही भूमिका साकारत आहेत. रहस्यमय कथानक असलेल्या या नाटकातील मूळ पुरुष पात्र बदलून स्त्री पात्र करण्यात आले आणि त्यालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च २०२५ रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात दुपारी ४.०० वाजता रंगणारा ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाचा प्रयोग हा महिला विशेष प्रयोग असणार आहे.
केवळ महिला प्रेक्षकांसाठी विशेष प्रयोग न ठेवता आजच्या तरुणींची भूमिका विशेषत्वाने मांडणाऱ्या ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकाचा ८ मार्च रोजी नवी मुंबईतील विष्णूदास भावे नाट्यगृहात दुपारी ४ वाजता होणाऱ्या प्रयोगासाठी महिला प्रेक्षकांना एका तिकीटावर एक तिकीट मोफत देण्यात येणार आहे. महिला प्रेक्षकांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी विष्णूदास भावे नाट्यगृहात जाऊनच तिकीट खरेदी करावे लागणार आहे.