मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी नवी मुंबई येथून भेसळयुक्त हळद आणि मसाल्यांचा साठा जप्त केला. विशेष मोहिमेअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या या साठ्याची किंमत २७ लाख ३९ हजार रुपये इतकी आहे. या साठ्याचे पाच नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासंबंधीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून एफडीएने भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात अनेक ठिकाणी छापे टाकून एफडीएने कोट्यवधी रुपये किंमतीचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. दरम्यान, मुंबई आणि एमएमआरमध्ये अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे.गुरुवारी एफडीएने नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी इंडस्ट्रियल एरिया परिसरातील मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड या उत्पादकाच्या आस्थापनेवर छापा टाकला. यावेळी येथे कमी दर्जाची आणि भेसळयुक्त हळद आढळली. एफडीएने येथून २९६ किलो भेसळयुक्त हळदीचा साठा जप्त केला.
हेही वाचा : मोबाइल ॲप तिकिटाची अंतराबाबतची अट शिथिल; मध्य व पश्चिम रेल्वेचा निर्णय
हळदीबरोबरच धणे पावडर ( ३९९८ किलो), मिरची पावडर (६४९८ किलो), जीरे पावडर (५४५४ किलो), तसेच करी पावडर (२४९८ किलो) आदींचा दर्जा कमी असल्याचे आढळून आले. एफडीएने येथून एकूण २७ लाख ३९ हजार रुपयांचा साठा जप्त केल्याची माहिती सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग, ठाणे सुरेश देशमुख यांनी दिली. दरम्यान. जप्त करण्यात आलेल्या अन्न पदार्थांचे पाच नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.