लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा लवकरच वाहतूक सेवेत दाखल होणार असून मुंबईकर भुयारी मेट्रो प्रवासासाठी उत्सुक आहेत. साधारण ६० टक्के मुंबईकर मेट्रो ३ मार्गिका वापरण्यासाठी उत्सुक असून त्यातील ६० टक्के नागरिक सध्या रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करणारे आहेत. अर्थ ग्लोबल या वाहतूक सेवेतील सल्लागार संस्थेने मेट्रो ३ च्या वापराबाबत केलेल्या सर्वेक्षणातून मुंबईकरांचा कल स्पष्ट झाला आहे. भुयारी मेट्रो हा अतिजलद वाहतूक व्यवस्थेचा पर्याय असल्याने आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असल्याने या नव्या दळणवळणाच्या साधनाचा वापर नागरिक अधिक उत्सुक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) माध्यमातून ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे काम करण्यात येत आहे. या मार्गिकेस विलंब झाला असला तरी आता त्यातील आरे ते बीकेसी टप्पा लवकरच वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात संपूर्ण मार्गिकेवरुन अर्थात आरे ते कफ परेड असा प्रवास करता येणार आहे. दरम्यान ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईस्थित अर्थ ग्लोबल संस्थेकडून मेट्रो ३ बाबत जुलैमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. अंधेरी पूर्व, विर्लेपार्ले, कलिना, वांद्रे पूर्व आणि धारावी परिसरातील १४८२ नागरिकांकडून मेट्रो ३ च्या वापराबाबतची प्रश्नावली भरून घेण्यात आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ६० टक्के नागरिकांनी मेट्रो ३ वापरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी मेट्रो ३ वापरणार असल्याचे ५८.९ टक्के पुरुषांनी आणि ५७.७ टक्के महिलांनी सांगितले आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे निर्माण झाल्यानंतर मेट्रो ३ मार्गिका इतर मेट्रो मार्गिकांशी जोडली गेल्यानंतर मात्र मेट्रो ३ च्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होईल असेही या अहवालातून समोर आले आहे.

हेही वाचा >>>ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बस दाखल होणार

रिक्षा, टॅक्सीपेक्षा मेट्रोच बरी…

सध्या रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांपैकी ६३ टक्के नागरिकांनी मेट्रो ३ चा पर्याय खुणावतो आहे. तर सध्या लोकल आणि बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांपैकी ५९ टक्के तर चारचाकी, दुचाकीने प्रवास करणाऱ्यांपैकी ५७ टक्के नागरिक मेट्रो ३ चा वापर करण्यास उत्सुक आहेत. मेट्रो प्रवासासाठी उत्सुक असलेल्यांपैकी ५८ टक्के पुरूष तर ५७ टक्के महिला आहेत. संभाव्य वापरकर्त्यांचा वयोगटानुसार विचार केल्यास १८ ते ३० वयोगटातील ५८ टक्के, ३१ ते ४५ वयोगटातील ५६ टक्के, ४६ ते ६० वयोगटातील ५९ आणि ६० वर्षांपुढील ४९ टक्के जणांनी मेट्रो ३ वाहतूक सेवेत दाखल झाल्या या मार्गिकेचा वापर करु असे स्पष्ट केले आहे.

४० टक्के नागरिकांचा नकार का?

मेट्रो ३ च्या सुरक्षेविषयी आणि आरामदायी प्रवासाविषयी मुंबईकरांना साशंकता असल्याचे चित्र आहे. केवळ १४.६ टक्के महिला तर १२.९ टक्के पुरुषांना हा वाहतूक पर्याय सुरक्षित वाटतो आहे. तसेच मेट्रो ३ मुंबईतील अनेक भागांशी जोडली गेलेली नाही. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये तिकिटदर अधिक असल्याची धास्तीही दिसली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A survey on the use of metro 3 by a consultancy firm in transport services mumbai print new amy