मुंबईतल्या दादर स्टेशनवर काही वेळापूर्वीच एक संशयित बॅग आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र या बॅगची तपासणी करण्यात आली असून त्या बॅगमध्ये घातक काहीही नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या विविध ठिकाणी गर्दी होते आहे. अशात मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनवर एक संशयित बॅग आढळल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र या बॅगमध्ये काहीही नसल्याचं निष्पन्न झालं आहे.
नेमकी काय घडली होती घटना?
मुंबईतल्या दादर स्टेशनवर एक संशयित बॅग आढळली होती. ही बॅग नेमकी कुणाची आहे? या बॅगेत काय आहे? या विषयी कोणतीही माहिती मिळालेली नव्हती. त्यामुळे तातडीने पोलिसांना आणि बॉम्बशोधक पथकाला बोलवण्यात आलं. पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने या बॅगेची तपासणी केली असता संशयास्पद काहीही आढळून आलं नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक पाचजवळच्या तिकिट काऊंटरजवळ ही बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.
मुंबईत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी होते आहे. अनेक लोक मुंबईत फिरायला येत आहेत. अशा सगळ्या वातावरणात दादर स्टेशनवर संशयित बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन वर्षात करोना असल्याने नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह म्हणावा तसा नव्हता. यंदा मात्र अशी स्थिती नाही. यंदा लोक अनेक ठिकाणी गर्दी करत आहेत. तसंच मुंबईतही फिरण्यासाठी लोक येत आहेत. अशा सगळ्या उत्साहाच्या वातावरणात मुंबईतल्या दादर स्टेशनवर संशयित बॅग आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र या बॅगमध्ये संशयास्पद काहीही आढळून आलं नाही हे समजल्यानंतर मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला आहे.
ANI ने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस ही बॅग ज्या ठिकाणी आढळली तिथे आले. त्यांनी या बॅगची तपासणी केली. यानंतर या बॅगमध्ये काहीही संशयित आढळलं नसल्याचं CPRO मध्य रेल्वे यांनी सांगितलं आहे.
याच वर्षी जून महिन्यात ठाण्यातही आढळली होती संशयित बॅग
याच वर्षी जून महिन्या ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या गेट क्रमांक २ समोर एक संशयित बॅग आढळली होती. ही बॅग कुणाची आहे हे समजू शकलेलं नव्हतं. मात्र नंतर बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक यांनी या बॅगेची तपासणी केल्यावर ही बॅग रिकामी असल्याचं समोर आलं होतं आणि त्यावेळी सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला होता. ३ जून २०२२ ला महापालिका मुख्यालयाच्या गेट क्रमांक दोन समोर ही बॅग आढळली होती. ही बॅग बेवारस असल्याने बॅगेत काही स्फोटकं तर नाहीत ना? या विचाराने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. मात्र बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केल्यानंतर ही बॅग रिकामी असल्याचं समोर आलं होतं. ज्यानंतर महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि तिथे असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.