कुलदीप घायवट
देशातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांत मुंबई शहर आणि उपनगर या दोन्ही जिल्हे आघाडीवर. मुंबई शहरात दाटीवाटीने झोपडपट्टय़ा, चाळी आणि अनियोजित बांधकामे उभी असून त्यात रोज नव्याने भर पडते. गगनचुंबी इमारतींनी मुंबईचे आकाशही व्यापून टाकले आहे. माणसाबरोबरच पक्षीही त्यांच्या वास्तू कौशल्याचे सुंदर नमुने मुंबईतही रोज साकारत असतात. दोन-तीन पानांमध्ये स्वत:चे विश्व तयार करतात.
पाने शिवून घरटे तयार करणारा, शहरी बागांमधील रहिवासी म्हणजे शिंपी पक्षी. या पक्ष्याच्या घरटे बांधण्याच्या शैलीमुळे त्याला एक कुशल वास्तुकार म्हणून संबोधले जाते. पिल्लांना सुरक्षित ठेवण्यासाठी पक्षी त्यांच्या आकारमानाप्रमाणे आणि गरजेप्रमाणे घरटी बांधतात. पक्ष्यांची घरटी लहानलहान नैसर्गिक आणि कृत्रिम वस्तूंचा वापर करून साकारलेली असतात. काहींची घरटी अत्यंत सामान्य दिसतात पण त्या पक्ष्याच्या जीवनशैलीला अनुरूप असतात. काही पक्ष्यांची घरटी बनवण्याची कला म्हणजे आश्चर्यच. जमिनीवर, कडय़ा-कपारीत, झाडाच्या ढोलीत, नदी काठावरच्या दलदलीत, फांद्यांना वाटीसारखी किंवा फांदीला लटकणारी घरटी बांधतात. पक्ष्यांच्या कौशल्याचे उत्तम प्रत्यंतर म्हणजे शिंपी पक्षी. हा पक्षी घरटे जमिनीपासून सुमारे ३ ते ६ फूट उंचीवर एखाद्या झुडपावर किंवा झाडावर बांधतो. दोन ते तीन पाने वळवून या दोन्ही पानांना गुंडाळून त्यांच्या कडा तंतू, धागा किंवा कोळिष्टकाने शिवलेल्या असतात. त्यात काडय़ा, कापूस, दोरे, गवत यांपासून छोटेसे घरटे असते. त्याच्या विणीचा काळ एप्रिल ते सप्टेंबपर्यंत असतो. त्याचे घरटे झुडपांमध्ये किंवा वेलींवर असते. बहुतांशवेळा वड, पिंपळ या झाडांच्या पानावर घरटी तयार केली जातात. नर आणि मादी दोघे मिळून दोघे मिळून घरटे बांधतात.
सर्वत्र शोधाशोध करून कापूस आणणे तो चोचीने पिंजून त्याचा दोरा तयार करणे आणि चोचीने पानांना छिद्र पाडून त्यातून दोरा घालून ती पाने सांधणे असे त्याचे काम चालते. चोचीचा वापर सुईप्रमाणे करून कापसाने दोन ते चार टाके मारून पाने शिवलेली दिसतात. पानांच्या वाटीची खालील बाजू पूर्णपणे शिवून बंद केली जाते. मधील खोलगट भाग तयार करून पाळण्यासारखे घरटे तयार होते. अंडय़ाचे आणि त्यावर बसणाऱ्या पक्ष्याचे वजन पेलवू शकेल इतके मजबूत हे घरटे असते. पानांतच असल्याने सहजी ते दिसत नाही. लालसर पांढऱ्या रंगाची व त्यावर तांबूस तपकिरी ठिपके असलेली अंडी शिंपी मादी देते.
शिंपी पक्षी चिमणीपेक्षा लहान असून १० ते १४ सेमी लांब असतो. शरीराच्या वरील बाजूूस पिवळसर हिरवा रंग, पोटाचा भाग पांढरट-पिवळसर, कपाळ व माथा तांबूस विटकरी रंगाचे असतात. तांबूस-पिवळे पाय, चोच लांब व अणकुचीदार, पंख व शेपटी तपकिरी, शेपटीची मधली पिसे लांब व टोकादार असून शेपटी नेहमी उभी असते. शिंपी हा पक्षी सिल्व्हिइडी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ‘ऑर्थोटोमस स्युटोरियस’ आहे. शिंपीला इंग्रजीत ‘कॉमन टेलरबर्ड’ असे म्हणतात. त्याच्या शिवणकाम पद्धतीमुळे त्याला ‘शिंपी’ असे नाव मिळाले.
आशियातील उष्णकटिबंधीय प्रदेशात शिंपी आढळून येतो. साधारणपणे शिंपी देशात सर्वत्र आढळत असून हिमालयाच्या १,५२५ मी. उंचीपर्यंत आणि दक्षिणेकडील डोंगराळ प्रदेशात १,२२० मी. उंचीपर्यंत आढळतो. तसेच श्रीलंका व म्यानमार येथे आढळतो. घनदाट जंगले व रखरखीत प्रदेशात शिंपी आढळून येत नाहीत. मुंबईत गवताळ भागात, घराभोवतालच्या बागेत, वेलींमध्ये, झुडपांच्या जंगलात दिसून येतो. शिंपी लाजाळू असल्याने झाडाझुडपात लपून बसतो. मात्र त्याच्या आवाजाने त्याची उपस्थिती लगेच कळते. झुडपांमध्ये भटकत असताना शिंपी ‘टुविट टुविट’, ‘टिव टिव’, ‘पिट् पिट्’ असा आवाज काढत असतात.
शिंपी हा पक्षी कधीही एकाच ठिकाणी बसून राहणार नाही. सतत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी उडय़ा मारीत भटकत असतो. सुरवंट, अळय़ा, सर्व प्रकारचे लहान किडे आणि त्यांची अंडी हे त्यांचे खाद्य. पांगारा, शेवरी झाडाच्या फुलांतील मधुरस तो शोषून घेतो. शिंपी पक्षी अतिशय कुशलपणे घरटी बांधतो, त्यामुळेच त्याला कुशल वास्तुकार म्हटले जाते.