एका शिक्षिकेने अल्पवयीन मुलास बेदम मारहाण केल्याची घटना वडाळा येथे उघडकीस आली आहे. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून तो समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. शबनम अमीन सय्यद असे मारहाण करणार्या महिलेचे नाव असून तिच्या विरोधात वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीची गंभीर दखल राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगाने घेतली असून पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागितला आहे.
हेही वाचा- दोषसिद्धीत ईडीची निराशाजनक कामगिरी; ‘एनआयएʼ आघाडीवर
वडाळ्याच्या भक्ती पार्क येथे राहणार्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे सोमवारी इमारतीत राहणार्या अन्य लहान मुलासोबत खेळतांना भांडण झाले. त्याचा राग मनात धरून शबनम अमीन सय्यद या महिलेने या मुलास इमारतीच्या आवारातच शिविगाळ करत बेदम मारहाण केली. मारहाणीचा हा व्हिडियो सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून सध्या तो समाज माध्यमावर वायरल होत आहे. मारहाणीत मुलाच्या कानाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या विरोधात ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अरगडे यांनी दिली. मारहाणीचा हा प्रकार गंभीर आहे. वैद्यकीय चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील गुन्हा दाखल केला जाईल. तसेच या महिेलेविरोधात कलम १०७ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई (चॅप्टर केस) करण्यात येणार आहे, अशी परिडमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंडे यांनी दिली. मारहाण करणारी महिला वडाळा येथील आयएसडब्लू शाळेची शिक्षिका आहे.
दरम्यान, मारहाणीच्या या प्रकाराची गंभीर दखल राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आयोगाने पोलिसांकडून मागवला आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षक महिलेवर योग्य कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शहा यांनी दिली.