मुंबई : खालापूरजवळील इरशालवाडीतील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पथक रवाना झाले आहे. या ठिकाणी पक्का रस्ता नसल्यामुळे वाहनांना वाट निर्माण करून देणारे एक विशिष्ट यंत्र महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाने खालापूर येथे पाठवले आहे. दुपारी उशिरापर्यंत हे यंत्र तेथे पोहोचण्याची शक्यता आहे.

खालापूर आणि आसपासच्या परिसरात बुधवारी मुसळधार पाऊस कोसळत होता. खालापूरजवळील इरशाळवाडीतील ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली आणि हाहाकार उडाला. घटनास्थळी पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या दुर्गम भागात ढिगारा उपासण्यासाठी जेसीबी किंवा अन्य वाहने पोहोचू शकत नाहीत. महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्घटनास्थळी ‘बॉब कॅट’ हे विशिष्ट यंत्र पाठवण्यात आले आहे. या यंत्राद्वारे वाहन जाण्यासाठी रस्ता तयार करणे शक्य होते. या यंत्राला लावलेल्या सरकत्या पट्ट्यां द्वारे वाहनांच्या टायरसाठी मजबूत ट्रॅक मिळतो.

हेही वाचा >>>मुंबई: करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरण; सुजीत पाटकर, किशोर बिसुरे यांना ईडीकडून अटक

त्यामुळे वाहन त्या ट्रॅकवरून पुढे सरकू शकते, अशी माहिती जी उत्तर विभागाचे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी इरफान काझी यांनी दिली. हे यंत्र समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेच्या वेळी वापरले जाते. खालापूरमधील दुर्घटनास्थळी बचाव कार्यासाठी हे यंत्र खास पाठवण्यात आले आहे. हे यंत्र रस्ता मार्गे जाणार असून त्याला प्राधान्याने वाट मोकळी करून द्यावी यासाठी सहाय्यक आयुक्तांनी विशेष पत्रही दिले आहे. दुपारी चार – साडेचार वाजेपर्यंत हे अंतर घटनास्थळी पोहोचण्याची शक्यता असल्याचेही काझी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मुंबई: लोकलमधील मालडब्याचे ज्येष्ठ नागरिक डब्यात रूपांतर करण्यास डबेवाला संघटनेचा विरोध

एकूण तीन ‘बॉब कॅट’ सयंत्र रवाना

घटनास्थळी मदत व बचावकार्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून ‘बॉब कॅट’ संयंत्र पाठवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार घन कचरा व्यवस्थापन विभागाने एकूण तीन ‘बॉब कॅट’ संयंत्रे पाठविली आहेत. माहीम रेतीबंदर, मुलुंड आणि जुहू येथून प्रत्येकी एक अशी तीन संयंत्रे घटनास्थळी रवाना झाली आहेत. पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत वांद्रे येथून पोकलेन संयंत्र रवाना करण्यात आले आहे.