मुंबई : मिकी माऊस, मिनी माऊस, डोनाल्ड डक, गुफी अशा कार्टूनमधील आपल्या आवडत्या पात्रांना भेटण्याची आणि विविध थरारक राईड्सचा अनुभव घेण्याची संधी लवकरच मुंबई, नवी मुंबईतील लहानग्यांना उपलब्ध होणार आहे. कारण नवी मुंबईत २०० हेक्टर जागेवर ‘डिस्नेलँड’च्या धर्तीवर ‘थीम पार्क’ साकारण्यात येणार आहे. ‘मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हब’च्या अंतिम आराखड्यात हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

देशाच्या आर्थिक विकासवाढीसाठी ‘निती’ आयोगाच्या शिफारशीनुसार, ‘एमएमआर ग्रोथ हब’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ‘एमएमआर ग्रोथ हब’चा अंतिम आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार, ‘एमएमआर’चा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून विकास करताना अनेकविध प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. त्या प्रकल्पाअंतर्गत औद्याोगिक, पर्यटन, शिक्षण, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, आरोग्य, बंदर विकास अशा अनेकविध क्षेत्रांचा विकास केला जाणार आहे. त्यानुसार ‘एमएमआर’ला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी या आराखड्यात अनेक प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.

अलिबागचा विकास जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून करण्यापासून ते मुंबई, ‘एमएमआर’मधील किल्ल्यांच्या संवर्धनाचा समावेश पर्यटन केंद्रात असणार आहे. तर राज्याप्रमाणेच देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई आय’सह नवी मुंबईत ‘डिस्नेलँड’च्या धर्तीवर जागतिक दर्जाचे ‘थीम पार्क’ही प्रस्तावित करण्यात आले आहे.

२०० हेक्टर जागेवर प्रकल्प

मुंबई, नवी मुंबई, ठाणे अर्थात ‘एमएमआर’मध्ये अनेक रिसॉर्ट, थीम पार्क, वॉटर पार्क आहेत. मात्र पहिल्यांदाच सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून नवी मुंबईत २०० हेक्टर जागेवर थीम पार्क उभारण्यात येणार आहे. एमएमआर ग्रोथ हबच्या अंतिम आराखड्यानुसार नवी मुंबईच्या दक्षिणेला थीम पार्क उभारण्यात येणार आहे. यामध्ये रिसॉर्ट, अॅनिमेशन स्टुडिओ, राईड्स झोन, वॉटर पार्क अशा अनेक बाबींचा समावेश असेल.

Story img Loader