चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पकडणाऱ्या पोलिसावर त्याने चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार पवई येथे बुधवारी घडला. या हल्ल्यात पोलीस शिपायाच्या छातीवर गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी हत्येचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार प्रशांत धुरी (३२) पवई पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. पवई पोलिसांचे पथक बुधवारी परिसरात गस्त घालत असताना दोन चोर तेथील एका दुकानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पाहात असल्याचे लक्षात येताच दोन्ही चोरांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक चोर पळण्यात यशस्वी झाला. पण तेथे तैनात असलेल्या वाहतूक पोलिसाने दुसऱ्या चोराला पकडले. त्यावेळी आरोपी सुब्रतो चित्तरंजन दास (२८) याला पवई पोलिसांच्या ताब्यात देत असताना आरोपीने त्याच्याकडील चाकू धुरी यांच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला. स्वतःला वाचवण्यासाठी धुरी मागे सरकले असता त्यांच्या उजव्या बरगडीवर चाकुमुळे गंभीर जखम झाली. या प्रकारानंतर इतर पोलिसांनी दासला पकडले. धुरी यांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

हेही वाचा >>>“…अशी कामं आमच्याकडे नगरसेवक अन् शाखाप्रमुख करतात”, रोजगार मेळाव्यावरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला!

धुरी यांच्या तक्रारीवरून दासविरोधात हत्येचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दास हा गोवंडी येथील रहिवासी असून सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात दोन चोरीचे गुन्हे नोंद आहेत. याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A thief attacked a policeman with a knife in powai mumbai print news amy
Show comments