लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईः मालाड पश्चिम येथे घरात शिरलेल्या अनोळखी चोराने पाण्याने भरलेल्या बादलीत तोंड बुडवून ६९ वर्षीय महिलेची हत्या केल्याचा गंभीर प्रकार गुरूवारी घडला. घरातील दागिने व मोबाइल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी महिलेच्या घरात काम करणारी मोलकरीण व तिच्या मुलाने आरोपी चोरासोबत कट रचून हा प्रकार केल्याची तक्रार मालाड पोलिसांना प्राप्त झाली असून याप्रकरणी मालाड पोलिसांनी तिघांविरोधात शुक्रवारी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मारी सिलीन विल्फ्रेड डिकोस्टा (६९) असे मृत महिलेचे नाव असून त्या मालाड पश्चिम येथील न्यू लाईफ सीएचएसमधील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ८ मध्ये वास्तव्यास होत्या. महिलेचा नातू नील गोपाल रायबो (२६) कामानिमित्त डिकोस्टा यांना दूरध्वनी करीत होता. पण प्रतिसाद न मिळाल्याने नीलने शेजाऱ्यांना दूरध्वनी करून घरी जाण्यास सांगितले. शेजाऱ्यांकडे असलेल्या चावीच्या साहाय्याने त्यांनी घर उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी शौचालयातील पाण्याने भरलेल्या बादलीत डिकोस्टा यांचे तोंड बुडालेले आढळले. शेजाऱ्यांनी घडलेला प्रकार नीलला सांगून डिकोस्टा यांना ताबडतोब कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून डिकोस्टा यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

हेही वाचा… मुंबईतील महाविद्यालयांमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांची पडताळणी करा; युवा सेनेची विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मागणी

नील गेल्या अनेक वर्षांपासून आजी डिकोस्टासोबत राहत होता. त्याला सध्या बंगळुरूमध्ये नोकरी लागली होती. त्यामुळे डिकोस्टा यांची देखभाल करण्यासाठी शबनम नावाच्या मोलकरणीला कामावर ठेवण्यात आले होते. ती अपंग असल्यामुळे तिचा मुलगा शहजादा त्यांना सोडण्यासाठी गुरुवारी आला होता. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली असता सायंकाळी काम झाल्यावर शबनम व शहजादा यांनी घराचा दरवाजा उघडाच ठेवला. त्यांच्या समोर एका संशयीत व्यक्ती मुखपट्टी परिधान करून घरात शिरली. या व्यक्तीनेच डिकोस्टा यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी नील याच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी मोलकरीण शबनम, तिचा मलगा शहजादा व एका चोराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा… संस्कृत भाषा तज्ज्ञ दीपक भट्टाचार्य यांचे निधन

संशयीत चोर गुरूवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास डिकोस्टा यांच्या घरात आला व पावणेसहाच्या सुमारास तो घरातून बाहेर पडल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात दिसत आहे. याप्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करीत आहेत. महिलेला तीन मुली असून त्यापैकी दोघी कुवेतला राहतात, तर एक मुलगी मिरा रोड परिसरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A thief killed a 69 year old woman in malad mumbai mumbai print news dvr
Show comments