गोरेगाव येथील शाळेत झालेल्या चोरीप्रकरणी मनिष अशोक मिश्रा नावाच्या व्यक्तीला आरे पोलिसांनी अटक केली. मुख्याधापकाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा >>>टीआरपी घोटाळा : अर्णब गोस्वामींविरोधातील मानहानीचा दावा परमबीर यांच्याकडून विनाअट मागे
वसई परिसरात वास्तव्यास असलेले रामराव धिवरे आरे कॉलनीतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत १८ शिक्षक, एक कारकून आणि एक शिपाई असे २० कर्मचारी तेथे कार्यरत आहेत. मुख्याध्यापकांच्या कार्यलयातील एका लोखंडी कपाटात किरकोळ खर्चासाठी काही रक्कम ठेवण्यात येते. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या शाळेत चोरी झाली. अज्ञात व्यक्तीने मुख्याध्यापकांच्या कार्यलयात प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम चोरून पलायन केले. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला असून एका अज्ञात व्यक्तीने कार्यलयाच्या दराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी केल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा >>>‘लोकसत्ता’चे ज्येष्ठ नाटय़ समीक्षक रवींद्र पाथरे यांना ‘कलादर्पण’ पुरस्कार
या घटनेनंतर रामराव धिवरे यांनी आरे पोलिसांत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविला. शाळेच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी मनिष मिश्रा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याचा या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे चौकशीत उघडकीस आले. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने अशाच पद्धतीने इतर ठिकाणीही चोरी केल्याचा संशय असून त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.