छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर मुंबई-अहमदाबाद या विमानाला उडवण्याच्या धमकीचा ई-मेल मिळाल्यामुळे शनिवारी प्रशासन आणि पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी सर्व यंत्रणांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यानंतर तासभर विलंबाने म्हणजे रात्री ११ च्या सुमारास विमान अहमदाबादला रवाना झाले.
मुंबई विमानतळ येथे शनिवारी सायंकाळी एक ई-मेल मिळाला. त्यात अहमदाबादला जाणारे ६ ई ६०४५ हे विमान उडवणार असल्याची धमकी देण्यात आली होती. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक यांना माहिती देण्यात आली. सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.
सुरक्षा यंत्रणांनी इंडिगो विमानात स्फोटके ठेवण्यात आली आहेत का, याची कसून चौकशी केली. मात्र विमानात अशी कोणतीही वस्तू आढळून आली नाही. मात्र या प्रकारामुळे रात्री साडे नऊ वाजता अहमदाबादला रवाना होणारे विमान रात्री १० वाजून ५८ मिनिटांनी अहमदाबादला रवाना झाले.
त्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश आले आहेत. त्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई अहमदाबाद विमानाबाबत संदेश मिळाला. सोमालिया देशातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला होता. त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सांताक्रुझ येथेही एका व्यक्तीला घातपाताच्या धमकीचा व्हिडिओ कॉल आला होता.