मुंबई: सिकलेल हा अनुवंषिक आजार असून आईवडिलांकडून अपत्याला होत असल्याने याबाबत वेळीच रक्ताची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात ११ ते १७ डिसेंबरदरम्यान सिकलसेल आजार जनजागृती सप्ताह राबविण्यात येत असून, सद्यस्थितीत राज्यात एकूण १९,२६४ सिकलसेल रुग्ण, तर १,४६,४१० आणि सिकलसेल वाहकांची संख्या आढळून आली आहे.त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपली सिकलसेलची रक्त तपासणी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये जाऊन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
राज्यात सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून २१ जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलढाणा, नांदेड, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजी नगर, रायगड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. सन २०२३-२५ या दोन वर्षांमध्ये ६२.९ लाख लोकांची सिकलसेल तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले असून त्यापैकी ४९.१८ लाख (७८.१८ टक्के) लोकांची तपासणी पूर्ण झाली आहे. लवकरच उर्वरित तपीसणीही पूर्ण केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा >>>जनावरांची अमानुष पद्धतीने होणारी वाहतूक रोखण्यासाठी काय प्रयत्न केले ? स्पष्टीकरण देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिकलसेल आजारविषयी नागरिकांमध्ये जनजागृती, रुग्णांना मोफत औषधे आणि त्यांचे समुपदेशन केले जाते. याशिवाय, मोफत सोल्युबिलीटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस केंद्रावर मोफत इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी, सिकलसेल रुग्ण व्यक्तींसाठी नियमित आरोग्य तपासणी, रुग्णांना गरजेनुसार फॉलीक अॅसिडच्या गोळ्या, अॅन्टीबायोटीक्स (प्रतिजैविके), वेदनानाशक औषधांचा पुरवठा, आवश्यकतेनुसार रक्त चाचण्यांची सुविधा, रक्तपेढी असल्यास सिकलसेल रुग्णांना रक्तसंक्रमण सुविधा, एच.पी.एल.सी. चाचणी केंद्रामध्ये मोफत चाचणी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी टेलिमेडिसीन आदी सुविधा आरोग्य विभागाच्या मार्फत पुरविल्या जातात. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोथू रंगा नायक, डॉ. स्वप्नील लाळे, संचालक मुंबई यांनी केले आहे.
सिकलसेल आजार हा आनुवंशिक असून आई-वडिलांपासून अपत्यांना होतो. सिकलसेल रक्त पेशीशी संबंधित आजार आहे. सामान्य रक्तपेशी या वर्तुळाकार व लवचिक असतात; तर सिकलसेल रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात. सशक्त लाल रक्त पेशी रक्त वाहिन्यांतून सरळ निघून जातात. परंतु, सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी वाहिन्यांना चिकटून राहतात. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन त्या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो. त्याला सिकलसेल क्रायसिस म्हणतात. यामुळे असहा वेदना होतात. अशी इजा वारंवार झाल्यामुळे अवयवाला जबरदस्त इजा होऊन तो अवयव निकामी होती.प्लीहा मध्ये नष्ट झालेल्या रक्तपेशी जमा होतात, सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी अडकल्यामुळे प्लीहेवर जबरदस्त सूज येते. त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. यामुळे आजारा विरुद्धची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे आजाराचे प्रमाण अधिक वाढते.
हेही वाचा >>>वांद्रयातील म्हाडा भवनात आता नागरी सुविधा केंद्र; नागरिकांची पायपीट थांबणार
सिकलसेल आजाराचे दोन प्रकार आहेत, पहिला प्रकार म्हणजे ‘वाहक’ (एएस) तर दुसरा प्रकार म्हणजे ‘रुग्ण’ (एसएस). या साजाराला प्रतिबंध करायचा असेल तर वाहक-रुग्ण, वाहक-वाहक, रुग्ण-रुग्ण यांनी आपआपसात विवाह करुन नये, कारण अशा विवाहामुळे होणारे अपत्य हे सिकलसेल वाहक किंवा रुग्ण होऊ शकते. परंतु सिकलसेलग्रस्त रुग्ण किंवा वाहक रुग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह केल्यास अपत्यांना सिकलसेल आजार होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
सिकलसेल हा आजार अनुवांशिक असल्यामुळे माता-पित्याकडून अपत्यांना हा आजार होतो परिणामी विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करुनच विवाह करावा, लाल (एसएस) आणि पिवळे (एएस) कार्ड असलेल्यांनी आपआपसात विवाह टाळावा,सिकलसेलग्रस्त किंवा वाहक रुग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह करावा,सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर आठ आठवड्याच्या आत गर्भजल तपासणी करून घ्यावी असे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा >>>Devendra Fadnavis: दादरमधील हनुमान मंदिराबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका काय? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट!
या आजारा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, हातापायावर सूज येणे, भूक मंदावणे,सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे आदी लक्षणे दिसतात. सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून या आजाराचा संपूर्ण उपचार नाही पण नियंत्रण करणे शक्य आहे. सिकलसेल रुग्णांना नियमित आणि समतोल आहार आवश्यक आहे. सिकलसेल रुग्णाचे योग्य औषधोपचाराने आयुष्य वाढते. सिकलसेलग्रस्त रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी व रक्त चाचणीची आवश्यकता असते, फॉलिक अॅसिडच्या गोळ्या निदमित घेणे, सोडामिंटच्या गोळ्यांचे सेवन महतत्वाचे असते. भरपूर पाणी पिणे (दररोज ८ ते १० ग्लास), वेदनाशामक गोळ्या, नियमित तपासणी व सल्ला घेणे. गरज भासल्यास रक्त संक्रमण करणे. समतोल आहार : सिकलसेल रुग्णांनी आहारात विविधता ठेवावी. दिवसातून तीन वेळा आहार घ्यावा. मासे, अंडी, संत्री, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, शेंगा, झिंक असलेले पदार्थ खाणे- बोनमरो ट्रान्सप्लांटेशन करून हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो.
सिकलसेलग्रस्त रुग्णांना (एसएस पॅटर्न) संजय गांधी निराधार योजने अंतर्गत शासनाचा आर्थिक लाभ मिळतो. १० वी व १२ वी मध्ये शिकणाऱ्या सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्येक तासाला २० मिनिटे अधिक अवधी दिला जातो. सिकलसेल रुग्णांना उपचाराकरिता बस प्रवासात सवलत दिली जाते.