मुंबई : कुर्ला येथील एल.बी.एल. मार्गावर वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मोटारगाडीने धडक दिली असून या अपघातात वाहतूक पोलिसाच्या पायाचे हाड मोडले. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटरगाडीचालकाला पोलिसाने थांबण्याचा इशारा केला होता. मात्र मोटरगाडीचा वेग वाढवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाने पोलिसाला धडक दिली. अपघातानंतर चालक तेथेच गाडी सोडून पळून गेला. त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार लक्ष्मण मोजर (४९) कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत आहेत. मोजर मंगळवारी कुर्ला येथील एल.बी.एस. मार्गावर वाहतुकीचे नियमन करीत होते. तेथे वाहनांना पूर्ण वळसा घेऊन विरुद्ध दिशेला जाण्यास मानाई आहे. असे असतानाही हा वाहनचालक नियमभंग करीत पूर्ण वळण घेऊन घाटकोपरच्या दिशेला जाण्याच्या प्रयत्नात होता. मोजर यांनी त्याला मोटारगाडी थांबवण्याचा इशारा दिला. सुरुवातीला मोटारगाडीचा वेग कमी होता. पण मोजर यांनी थांबण्याचा इशारा देताच चालकाने मोटारगाडीची गती वाढवली व थेट मोजर यांना धडक दिली. त्यानंतर मोजर जमिनीवर कोसळले.
हेही वाचा – मुंबईला पुरेशी वीज उपलब्ध नसल्याने टाटांची औष्णिक वीजनिर्मिती सुरु राहणार
अपघात झाल्यानंतर चालकाने गाडी तेथे सोडून पळ काढला. अपघातानंतर मोजर यांना तातडीने भाभा रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ला पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपी चालकाची ओळख पटल्याचे सूत्रांनी सांगितले.