मुंबई: विशेष मुलांवरील उपचार आणि त्यांचे पुनर्वसन करणे आव्हानात्मक असते. परंतु मुंबई महानगरपालिकेने नायर रुग्णालयात सुरू केलेले प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्र हे खासगी रुग्णालयामधील केंद्रांपेक्षा अधिक चांगले आहे. विशेष गरजा असलेली मुले राज्यभरात असल्याने त्यांच्या उपचारासाठी मुंबईप्रमाणे ठाणे व अन्य जिल्ह्यांमध्येही अशी केंद्रे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नायर रुग्णालयातील प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विशेष गरजा असलेल्या मुलांना निसर्गाने थोडे कमी दिले असले तरी परमेश्वराने त्यांना थोडे अधिक दिले आहे. त्यामुळे या मुलांसाठी नायर रुग्णालयांमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्र पाहिल्यावर ते महानगरपालिकेचे आहे, असे वाटतच नाही. मुंबई महानगरपालिकेने ठरवले तर ते किती उत्तम काम करू शकतात. याचे हे उदाहरण आहे. या केंद्रामध्ये ४०० ते ५०० मुले उपचार घेत आहेत. विशेष गरजा असलेल्या मुलांची काळजी प्रत्येक पालकाला असते. त्यांच्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. या मुलांवरील उपचारासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी भरपूर खर्च येतो. मात्र आता यापुढे पालकांनी पैशाची चिंता करायची नाही. या मुलांच्या उपचाराची जबाबदारी सरकारने उचलली आहे. त्यांच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतील, असे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा… वर्षानुवर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना मिळणार हक्काचे घर

विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला हा उपक्रम स्त्युत्य असून, याची अंमलबजावणी ठाण्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. विशेष मुलांवर उपचार करणे, त्यांना शिकविणे, त्यांना फिजिओथेरपी देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे काम अत्यंत अवघड आणि कठीण असते. मात्र तरीही मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी हे काम अत्यंत जिव्हाळ्याने, आपलेपणाने आणि सेवाभावी वृत्तीने करत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.

मुंबईमध्ये आणखी दोन केंद्रे उभारण्याचे आदेश

नायर रूग्णालयाने सुरू केलेले विशेष मुलांसाठीचे उपचार केंद्र म्हणजे त्या मुलांसाठी विशेष शाळा आहे. अशा अधिकाधिक मुलांना उपचार मिळावेत यासाठी मुंबईमध्ये आणखी दोन अशाप्रकारची अद्ययावत व सुसज्ज केंद्र उभारण्यात यावेत. चे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.

आमदार रईस शेख यांच्या मुलीच्या हस्ते उद्घाटन

आमदार रईस शेख यांच्या मुलीवर नायर रुग्णालयातील प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. विशेष गरजा असलेल्या मुलांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी आमदार रईस शेख यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे या उपचार केंद्रांचे उद्घाटन रईस शेख यांच्या उपचार सुरू असलेल्या मुलीच्या हस्ते करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A treatment center for special children will also be started in thane testimony of chief minister eknath shinde mumbai print news dvr
Show comments