मुंबई : ग्रॅंटरोड पश्चिमेकडील नौशीर भरूचा मार्गावर मंगळवारी पहाटे झाड पडल्याची घटना घडली. त्यामुळे काही वेळासाठी या रस्त्यावरील वाहतूक वळवावी लागली, बसमार्गही वळवावे लागले. अपघातामुळे झाड पडल्याचा संशय असून पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.
ग्रॅंटरोड पश्चिमेकडे रेल्वे स्थानकाला समांतर जाणाऱ्या नौशीर भरूचा मार्ग अर्थात स्लेटर रोड परिसरात पहाटेच्यावेळी अचानक झाड पडल्याची घटना घडली. यामुळे ताडदेवच्या दिशेने जाणारा मार्ग पूर्ण बंद झाला. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने झाड हटवण्याचे काम तासाभरात पार पाडले. हे झाड साधारण तीस वर्षे जुने भेंडीचे झाड असल्याची माहिती उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. झाड वादळवाऱ्यामुळे किंवा कमकुवत झाल्यामुळे पडलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या आणखी एकाविरोधात म्हाडाकडून गुन्हा दाखल
पहाटेच्यावेळी एक वाहन या झाडाला धडकल्यामुळे ही दुर्घटना झाल्याची या परिसरात चर्चा आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मात्र झाड पडल्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून सर्व वाहतूक जावजी दादाजी मार्गावरून वळवण्यात आली होती. या ठिकाणी १५५ चक्राकार (रिंग रूट) बसमार्ग असून या मार्गावरील बसगाड्या सकाळी सहा वाजल्यापासून वळवण्यात आल्या होत्या. झाडाच्या फांद्या हटवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर साडेदहा वाजल्यापासून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.