मुंबई : वर्षभरात राज्याची अर्थव्यवस्था सहा लाख कोटींनी वाढली असून सर्व क्षेत्रात गतिमान विकास होत आहे. अर्धा लाख डॉलर्स कोटींचा पल्ला गाठणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान लवकरच एक लाख कोटी डॉलर्स कोटी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला. तर सध्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान ४० लाख कोटी असून, ८३ लाख कोटींचा टप्पा गाठण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.

राज्याची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. २०१३ मध्ये १६ लाख ५० हजार कोटींचे आकारमान होते. सध्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान ४० लाख कोटींपेक्षा अधिक झाले आहे. म्हणजेच १० वर्षांत २४ लाख कोटींनी अर्थव्यवस्थेत वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षाअखेर राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान हे ४२ लाख कोटी होईल. याचाच अर्थ गेल्या वर्षभरात सहा लाख कोटींने अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढणार आहे, असेही फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्याने एक लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना त्यापैकी निम्मे लक्ष्य गाठले आहे. देशात एक लाख कोटींची अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>महालक्ष्मी रेसकोर्सवर अखेर पब्लिक पार्क; १२० एकर भूखंड आता महानगरपालिकेच्या ताब्यात, भाडेपट्टा करारावर स्वाक्षरी

फडणवीस यांनी एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न लवकर साकार होईल, असा विश्वास व्यक्त केला असला तरी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था कधी होणार, असा सवाल केला. सध्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान ४० लाख कोटी आहे. सध्याच्या डॉलर्सच्या दरानुसार ८३ लाख कोटींचे उद्दिष्ट गाठावे लागणार आहे. म्हणजेच अजून ५० टक्क्यांपेक्षा अधिक लक्ष्य गाठायचे आहे. २०२८ पर्यंत अर्थव्यवस्थेचे आकारमान एक लाख कोटी डॉलर्स होण्यासाठी १४ ते १५ टक्के विकास दर गाठण्याची शिफारस आर्थिक सल्लागार परिषदेने केली आहे. त्याचे काय झाले, असा सवाल चव्हाण यांनी केला.