गेल्या तीन वर्षांपासून सतत पोटाचा घेर वाढत असल्याने आणि खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नसल्याने कामा रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या ४९ वर्षीय महिलेच्या पोटातून ३.५९६ किलो वजनाचा मांसाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. अत्यंत गुंतागुतीची ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याची उल्लेखनीय कामगिरी कामा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केली.
मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या मीना निरांजन खारवा (४९) जन्मत:च अपंग आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या पोटाचा घेर वाढू लागला होता. त्यामुळे ८ फेब्रुवारी रोजी त्या उपचारासाठी कामा रूग्णालयात दाखल झाल्या. वैद्यकीय तपासणी करून त्यांना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि पथक प्रमुख डॉ. तुषार पालवे यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल करण्यात आले. कामा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मीना यांनी खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन आदी तपासण्या केल्या होत्या. त्यामध्ये त्यांच्या गर्भाशयातील अंडाशयावर मोठी गाठ असल्याचे निदर्शनास आले होते. ही गाठ कर्करोगाची असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे ही गाठ शस्त्रक्रिया करूनच काढणे गरजेचे होते. परंतु आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे खाजगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करणे खारवा कुटुबियांना परवडणारे नव्हते. परिचयातील एका व्यक्तीने दिलेल्या सल्ल्यानुसार मीना ८ फेब्रुवारी रोजी कामा रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल झाल्या. त्यानंतर त्यांच्या विविध वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या.
हेही वाचा >>>मुंबई: घाटकोपर जलाशयाची दुरुस्ती करणार साडे नऊ कोटींचा खर्च
सर्व तपासण्या केल्यानंतर ९ मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातून ३.५९६ किलो वजनाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले. तपासणीअंती त्या गाठीमध्ये करकरोगाची लक्षणे आढळून आली नाहीत. खाजगी रुग्णालयामध्ये याच सर्जरीसाठी साधारणतः दीड लाख रुपयांहून अधिक खर्च येतो. मात्र कामा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.
मीना खारवा यांच्यावर करण्यात आलेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे महिला प्रसूती, स्त्रीरोग आणि बालरुग्णांसाठी प्रसिद्ध असलेल्या कामा रुग्णालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रसूती आणि स्त्री रोग तज्ज्ञ त्याचप्रमाणे पथक प्रमुख या नात्याने आमच्या संपूर्ण पथकाचे हे यश रुग्णालयाचा व रुग्णसेवेचा आलेख उंचावणारे आहे.- डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय