मुलुंड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या एका गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला अटक केली होती. या मुलाला न्यायालयात हजर केले असता, त्याला महिनाभर पोलीस ठाण्यात जाऊन तेथे येणारे तक्रारदार, ज्येष्ठ नागरिक, अपंग नागरिकांना मदत करण्याची अनोखी शिक्षा ठोठावली आहे.मुलुंड रामगड येथे ऑगस्ट २०२२ मध्ये एका १६ वर्षीय मुलाने एका घरात घरफोडी करून चार मोबाइल आणि काही रोख रक्कम लुटून नेली होती. याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलुंड पोलिसांनी सदर प्रकरणात या मुलाला अटक केली.
हेही वाचा >>>मुंबई:प्रेयसीसोबत फिरणाऱ्या तरुणाची भरस्त्यात हत्या
पोलिसांनी त्याच्याकडून मुद्देमालही जप्त केला. पोलिसांनी या मुलाला बाल न्यायालयापुढे हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्याला त्याच्या कुटुंबियाच्या ताब्यात दिले. नोव्हेंबरमध्ये मुलुंड पोलिसानी या गुन्ह्यासंदर्भात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने आरोपीला प्रथमच केलेल्या या गुन्ह्यात दोषी ठरवून २३ जानेवारी रोजी अनोखी शिक्षा सुनावली.१ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आरोपीने रोज एक तास मुलुंड पोलीस ठाण्यात जाऊन तेथे येणारे तक्रारदार, जेष्ठ नागरिक आणि अपंग नागरिकांना मदत करावी. शिवाय योग्य मार्गदर्शन करून त्यांना संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवावे, अशी अनोखी शिक्षा न्यायालयाने आरोपीला सुनावली.